Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र अधिकृत वेबसाइट सुरू करण्याचा निर्णय! पर्वणीपासून पार्किंगपर्यंतची सगळी माहिती एका क्लिकवर

Nashik Kumbh Mela 2027 Official Website : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ ची नाशिक जिल्हाप्रशासनाकडून जोरदार तयारी सुरु असून त्याचाच भाग म्हणून आता कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र अधिकृत वेबसाइट सुरू करण्याचा निर्णय झाला.
Sinhastha Kumbh Mela
Sinhastha Kumbh MelaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Kumbh Mela website : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीचा भाग म्हणून नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या वतीने अधिकृत संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. भाविकांना कुंभमेळ्याशी संबंधित अधिकृत व विश्वासार्ह माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, तसेच यात्रेचे नियोजन अधिक सुलभ करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

ध्वजारोहण सोहळ्यावेळी या संकेतस्थळाच्या प्राथमिक आवृत्तीचे अनावरण करण्यात येणार आहे. सुरुवातीला कुंभमेळ्याची मूलभूत माहिती उपलब्ध करून देणारे हे संकेतस्थळ पुढील टप्प्यांत अधिक सक्षम करण्यात येईल. त्यामध्ये थेट अद्ययावत माहिती, विविध डिजिटल सुविधा आणि संबंधित यंत्रणांच्या प्रणालींशी समन्वय साधणाऱ्या सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.

कुंभयात्रेच्या नियोजनासाठी एकच व्यासपीठ

संकेतस्थळावर कुंभमेळ्याचा इतिहास, धार्मिक व सांस्कृतिक परंपरा, महत्त्वाची मंदिरे, घाट, आखाडे आणि धार्मिक स्थळांची माहिती उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. पर्वणी स्नानाच्या तारखा व वेळा, महत्त्वाच्या घोषणा, सूचना आणि भाविकांसाठी आवश्यक मार्गदर्शनही या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे पोहोचण्यासाठी हवाई, रेल्वे, रस्ते आणि स्थानिक वाहतुकीसंबंधी माहिती एकाच ठिकाणी देण्याचे नियोजन आहे. पुढील टप्प्यांत वाहनतळ, वाहतुकीतील बदल, प्रवेश व निर्गमन मार्ग, शटल सेवा, पायी जाण्याचे मार्ग आणि सार्वजनिक वाहतूक पर्यायांची माहितीही उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.

Sinhastha Kumbh Mela
Maharashtra Kendra Pramukh Salary : शिक्षक म्हणूनच राहिलो असतो तर बरं झालं असतं! राज्यातील ३५०० हून अधिक केंद्रप्रमुखांचे वेतन रखडले

मूलभूत सुविधांची माहिती मिळणार

भाविकांना आवश्यक सुविधा शोधणे सोपे व्हावे, यासाठी संकेतस्थळावर विविध सेवांची स्वतंत्र निर्देशिका प्रस्तावित आहे. यामध्ये स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, स्नान सुविधा, वैद्यकीय मदत केंद्रे, रुग्णालये, पोलिस चौक्या, मदत कक्ष, हरवले-सापडले केंद्रे, निवास व्यवस्था, अन्नसेवा, वाहनतळ, बस स्थानके आणि रेल्वे स्थानकांची माहिती समाविष्ट असेल.

संकेतस्थळाच्या पुढील आवृत्तीत शोध सुविधा आणि नकाशाच्या माध्यमातून या ठिकाणांची माहिती मिळवता येईल, अशी व्यवस्था विकसित करण्याचे नियोजन आहे.

सुरक्षा आणि आपत्कालीन मदतीवर भर

कुंभमेळ्यादरम्यान भाविकांना वेळेवर आणि अधिकृत माहिती मिळावी, यासाठी संकेतस्थळावर स्वतंत्र सुरक्षा व आपत्कालीन मदत विभाग प्रस्तावित आहे. पोलिस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, नियंत्रण कक्ष आणि अन्य हेल्पलाइन क्रमांकांसह सार्वजनिक आरोग्यविषयक सूचना, गर्दी व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शन आणि प्रतिबंधित वस्तूंची माहिती येथे उपलब्ध करून देण्यात येईल.

संबंधित यंत्रणांकडून माहिती उपलब्ध होऊन आवश्यक डिजिटल प्रणाली कार्यान्वित झाल्यानंतर वाहतुकीतील बदल, हवामानविषयक सूचना, नदीच्या स्थितीबाबतचे इशारे, गर्दीविषयक माहिती आणि अन्य महत्त्वाच्या सूचनाही संकेतस्थळावर अद्ययावत करण्याचे नियोजन आहे.

Sinhastha Kumbh Mela
Nashik Bird Election News : कावळा की गिधाड? नाशिकच्या शहर पक्ष्यासाठी निवडणूक; महापौरांनी केलं पहिलं मतदान

विविध भाषांमध्ये, मोबाइलवरही सहज उपलब्ध

देशाच्या विविध भागांतून तसेच परदेशातून येणाऱ्या भाविकांनाही माहिती सहज मिळावी, यासाठी संकेतस्थळ बहुभाषिक स्वरूपात विकसित करण्याचे नियोजन आहे. संगणक आणि मोबाइलवर सहज वापरता येण्यासोबतच कमी इंटरनेट वेगातही ते कार्यक्षम राहील, यावर भर देण्यात येणार आहे. दिव्यांग व्यक्तींसह विविध गरजा असलेल्या वापरकर्त्यांना माहिती सहज मिळावी, यासाठी सुलभतेशी संबंधित सुविधांचाही विचार करण्यात आला आहे.

याशिवाय, निवडक घाट, मंदिरे आणि सार्वजनिक ठिकाणांची आभासी सफर, ३६० अंश दृश्ये, ध्वनिमार्गदर्शन, व्हिडिओ आणि अधिकृत थेट प्रक्षेपणाच्या लिंक अशा सुविधांचाही प्रस्ताव आहे. वारंवार विचारले जाणारे प्रश्न आणि मदतीसाठी आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्याची व्यवस्थाही विकसित करण्यात येणार आहे.

कुंभदूत’सह एकात्मिक डिजिटल यंत्रणा

अधिकृत संकेतस्थळ हे कुंभमेळ्यासाठी विकसित करण्यात येणाऱ्या व्यापक डिजिटल व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग असेल. यामध्ये मोबाइल ॲप्लिकेशन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भाविक सहाय्य प्रणाली ‘कुंभदूत’ यांचाही समावेश प्रस्तावित आहे. या विविध माध्यमांद्वारे भाविकांना एकसमान, अधिकृत आणि विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असेल.

संकेतस्थळाच्या सुविधा टप्प्याटप्प्याने विकसित होत असताना भाविकांना माहिती मिळवणे, यात्रेचे नियोजन करणे आणि आवश्यक सेवांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com