Jalgaon Politics : जळगावच्या राजकारणात आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. भाजपने आता लोकसभा निवडणुकीप्रमाणेच या निवडणुकीतही सुरैश जैन यांचा पाठिंबा व मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांची खटाटोप सुरु असून ते जैन यांची मनधरणी करत असल्याचे बोलले जात आहे.
तब्बल ३५ वर्ष जळगाव महापालिकेवर वर्चस्व गाजवलेल्या याच सुरेश जैन यांचं संस्थान २०१८ च्या निवडणुकीत भाजपने खालसा केलं व पालिकेत सत्ता मिळवली. सुरेशदादांच्या विरोधात भाजपने तेव्हा आघाडीच उघडली होती. मात्र त्याच भाजपला आता जैन यांची गरज भासत आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जैन यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. ते राजकारणापासून दूर गेले. मात्र तेव्हाही भाजपने जैन यांची मनधरणी केली होती. त्यात भाजपला यश आलं होतं, जिल्ह्यातील भाजपच्या दोन्ही उमेदवारांना जैन यांनी पाठिंबा जाहीर केला होता.
जैन हे सध्या कोणत्याही राजकीय पक्षात नसून ते राजकारणापासून अलिप्त आहेत. मात्र भाजप लोकसभेप्रमाणे पुन्हा जळगाव महापालिका निवडणुकीसाठी जैन यांचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. माजी मंत्री जैन यांना मानणारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील १३ माजी नगरसेवकांचा गट फोडण्याच्या तयारीत भाजप असून त्यासाठी भाजपकडून मंत्री गिरीश महाजन हे जैन यांची मनधरणी करीत असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात आहे.
जैन यांचे समर्थक असलेल्या तीन मात्तबर नेत्यांनी बुधवारी मुंबईत गिरीश महाजन यांची भेट घेतली. या पदाधिकाऱ्यांसह काही नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा झाल्याचे वृत्त आहे. माजी महापौर नितीन लढ्ढा, माजी उपमहापौर सुनील महाजन यांच्यासह एका पदाधिकाऱ्याने ही भेट घेतल्याची माहिती आहे. यावेळी भाजपप्रवेशाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे. परंतु या माजी नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यासाठी जैन यांची पुन्हा मनधरणी करण्याची वेळ भाजपवर आली आहे. या प्रयत्नात भाजपला यश आल्यास ठाकरे गटासाठी तो मोठा धक्का असेल.
काही महिन्यापूर्वी संजय राऊत हे देखील जळगाव दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सुरेश जैन यांची भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जैन यांचा पाठिंबा मिळवून फायदा करुन घेण्याच्या उद्देशाने या भेटीत चर्चा झाल्याचे सांगितले गेले होते. त्यामुळे जैन नेमकी काय भूमिका घेतात. त्यांची मनधरणी करण्यात भाजपला यश येईल का हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.