JDCC Bank Election, जळगाव जिल्हा बॅंक  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

JDCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या 18 जागांसाठी 309 उमेदवार रिंगणात, एकही मागे हटेना

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत १८ जांगासाठी ३०९ उमेदवार रिंगणात आहेत. अद्याप एकाही उमेदवाराने माघार घेतलेली नाही. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढणार आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आतापर्यंत तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे आता उर्वरित १८ संचालकपदासाठी ३०९ उमेदवार रिंगणात आहेत. माघारीसाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत असून बुधवारपर्यंत एकाही उमेदवाराने माघार घेतली नाही.

१८ नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे, तसेच चिन्हवाटप होईल. त्यामुळे अंतिम क्षणापर्यंत कोण कोण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतात याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी एकुण ४०२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. त्यातील ९३ अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाल्याने आता ३०९ उमेदवार रिंगणात उरले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासमोर आव्हान कायम आहे. अर्ज छाननीत संचालकपदाच्या दहा वर्षांच्या अटीमुळे मावळते अध्यक्ष संजय पवार, आमदार अनिल पाटील यांचा, तर विविध कारणांमुळे पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमीत पाटील यांचे अर्ज बाद झाले आहेत.

मुक्ताईनगर मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, देवयानी चंद्रकांत देशमुख, विनोद तराळ, एकनाथ खडसे यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांच्यासह चार उमेदवार रिंगणात आहेत.

बिनविरोध झालेले उमेदवार

शिवसेनेचे आमदार अमोल पाटील यांच्या मातोश्री नलिनी पाटील, पत्नी मृणाल पाटील, तर मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे यांचा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाचोरा मतदारसंघात भाजपचे सतीश परशुराम शिंदे हेही एकमेव उमेदवार आहेत.

भाजप -शिवसेनेत युतीची शक्यता कमीच?

दरम्यान जागावाटप आणि युतीबाबत अजून कोणता ठोस निर्णय झालेला नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार बँकेचे चेअरमनपद कोणाकडे राहणार, यावरून महायुतीत, विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र, याबाबत तर्कवितर्काना उधाण आले आहे.

सुरुवातीच्या चर्चेत भाजप आणि शिंदे सेनेच्या दोन्ही प्रमुखांनी चेअरमनपदावर आपलाच दावा ठोकला आहे. ज्या पक्षाचे जास्त संचालक निवडून येतील, त्याच पक्षाचा चेअरमन असा प्रस्तावही काहींनी मांडला.मात्र त्यावर एकमत होऊ शकले नाही. राजकीय वर्तुळात रंगलेल्या या वादामुळे पहिली अधिकृत चर्चा पूर्णपणे निष्फळ ठरली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतरच खऱ्या अर्थाने युती किंवा महायुतीचे चित्र स्पष्ट होईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT