Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणूक रिंगणात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या तीन मंत्र्यांनी उडी घेतली. भाजपचे मंत्री गिरीश महाजन, रक्षा खडसे यांच्यासह शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दिग्गज निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने निवडणुकीचा माहोल बदलला आहे. जिल्हा बँकेची निवडणूक आता केवळ सहकार क्षेत्रापुरती मर्यादित न राहता महायुतीच्या राजकीय प्रतिष्ठेचा विषय ठरू शकते.
शुक्रवारी (दि. ३०) उमेदवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस होता. जिल्हा बँकेच्या आवाराला एखाद्या जत्रेचे स्वरूप आले होते. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह १८७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. अखेरीस एकूण ४०२ अर्ज दाखल झाले आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे व मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः न येता त्यांच्या सूचकांद्वारे उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनासह कार्यकर्त्यांच्या गदारोळात प्रत्यक्ष उपस्थित राहून आपले अर्ज सादर केले.
तर भाजपच्या रजनी सावकारे, शिवसेनेच्या नलिनी पाटील व मृणाल पाटील यांच्या समोर विरोधकांकडून कुणीही उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने त्यांचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला. त्यांच्या समर्थकांनी बँकेच्या आवारात फटाके फोडून जल्लोष केला.
पाटलांचा डबल धमाका
पारोळा आणि एरंडोल मतदारसंघांमध्ये पाटील घराण्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. माजी आमदार चिमणराव पाटील पारोळा मतदारसंघातून संचालक म्हणून गेल्या २० वर्षांपासून सलग बिनविरोध निवडून येत आहेत; तर आमदार अमोल पाटील एरंडोल मतदारसंघातून गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने बिनविरोध विजयी झाले. या निवडणुकीतही विरोधकांकडून कोणताही अर्ज न आल्याने या दोन्ही मतदारसंघांतील बिनविरोध विजयाची ऐतिहासिक परंपरा कायम राहिली आहे. शिवसेनेचे आमदार अमोल पाटील यांच्या मातोश्री नलिनी पाटील आणि पत्नी मृणाल पाटील बिनविरोध झाल्या.
शेवटच्या दिवशी अर्ज भरलेले उमेदवार असे
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, संगीता भंगाळे, योगेश कोलते, माजी सभापती प्रभाकर सोनवणे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, ॲड. ललिता पाटील, पांडुरंग काळे, चंद्रकांत बारेला, धनश्री देवकर, सुप्रिया पवार, पद्मजा देशमुख, डी. डी. वाणी, अतुल पाटील, प्रशांत पवार, आनंदराव देशमुख, शैलजादेवी निकम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, माजी अध्यक्ष राजीव पाटील, उदय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, वैशाली पाटील, प्रदीप देशमुख आदी.
असा आहे पुढील कार्यक्रम
उमेदवारी अर्जाची छाननी : २ नोव्हेंबर
उमेदवारांची वैध यादी प्रसिद्ध : ३ नोव्हेंबर
अर्ज मागे घेण्यासाठी मुदतः ३ ते १७ नोव्हेंबर
अंतिम यादी प्रसिद्ध व चिन्हवाटप : १८ नोव्हेंबर
प्रत्यक्ष मतदान : २९ नोव्हेंबर
मतमोजणी व निकाल : ३० नोव्हेंबर
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.