Jalgaon DCC Bank Election  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

JDCC Bank Election : जिल्हा बँकेच्या ‘पिच’वर मंत्री-आमदार उतरले; मंत्री गिरीश महाजन यांच्यासह खडसे, चव्हाण यांचे ठराव चर्चेत..

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्ह्यात सध्या जिल्हा बॅंकेच्या आगामी निवडणुकीची धामधूम सुरु आहे. मंत्री-आमदारांसह त्यांच्या कुटुंबियांचे ठराव स्पष्ट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बॅंकेच्या आगामी निवडणुकीची रणधुमाळी आता अधिक तीव्र झाली आहे. जिल्हा बँकेच्या ‘पिच’वर मंत्री-आमदार उतरले असून प्रारुप मतदार यादीतून मंत्री गिरीश महाजन, रक्षा खडसे, आमदार मंगेश चव्हाण या दिग्गजांसह सहा आमदार व त्यांच्या कुटुंबियांच्या नावाचे ठराव स्पष्ट झाले आहे.

विभागीय सहनिबंधक तथा जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी संभाजी निकम यांनी बँकेच्या २५६८ मतदारांची प्रारूप मतदार यादी २१ सप्टेंबर रोजी अधिकृतपणे जाहीर केली. या यादीत जिल्ह्यातील मंत्री, आमदार, माजी मंत्री तसेच विद्यमान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ठरावाचा समावेश असल्याचे दिसून आले आहे.

प्रारुप मतदार यादीत मंत्री गिरीश महाजन यांचा जामनेर तालुक्यातील हिवरखेडा तर त्यांच्या पत्नी साधना महाजन यांचा सुनसगाव येथील संस्थेतून ठराव झाला आहे. त्यामुळे महाजन कुटुंबातील दोन्ही नावे मतदार यादीच्या प्रक्रियेत समोर आली आहे. तसेच खडसे कुटुंबातील दोन नावे प्रारुप यादीत आहेत. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे कर्की, कोथळी व घोडसगाव या तीन संस्थांमधून ठराव असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तर एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा सालबर्डी येथून ठराव झालेला आहे.

चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचा तालुक्यातील हिंगोणे व हिरापूर येथून ठराव असल्याचे नमूद आहे. आमदार चंद्रकांत सोनवणे यांचा जळगाव शहरातील मेहरुण नागरी पतसंस्थेतून, आमदार अमोल पाटील यांचा देवगाव तर त्यांच्या मातोश्री नलिनी पाटील यांचा गृहनिर्माण संस्थेतून ठराव झाला आहे. तसेच शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचा अंतुर्ली येथून तर त्यांचे सुपुत्र सुमित पाटील यांचा अंतुर्ली-लोहारा येथून ठराव झाला आहे. आमदार अनिल पाटील यांचा अमळनेर तालुक्यातील अमळगाव तर त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचा सोनखेडी येथून ठराव निश्चित झाला आहे.

तर बँकेचे विद्यमान चेअरमन संजय पवार यांचा चोरगाव व उखळवाडी, तर त्यांच्या पत्नी सोनल पवार यांचा चांदसर व गारखेडा येथून ठराव झाला आहे. माजी मंत्री गुलाबराव देवकर (पाथरी), पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील यांचा 'पाळधी', महापालिकेच्या नगरसेविका वैशाली अमित पाटील यांचा 'चांदसर', प्रदीप देशमुख यांचा चाळीसगाव, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा पिंप्राळा तसेच सुनील महाजन आणि माजी महापौर जयश्री महाजन यांचे मेहरुण येथून ठराव समाविष्ट आहेत.

३० सप्टेंबरपर्यंत हरकती

प्रसिद्ध करण्यात आलेल्या या प्रारूप मतदार यादीवर ३० सप्टेंबरपर्यंत हरकती व आक्षेप नोंदवता येणार आहेत. प्राप्त झालेल्या अर्जावर ९ ऑक्टोबर रोजी सुनावणी होऊन निर्णय घेतला जाईल. यानंतर १४ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. दरम्यान अंतिम यादीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. साधरणपणे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा दिवाळीनंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT