Raksha Khadse On Chandrakant Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

JDCC Bank Election : मंत्री रक्षा खडसे की आमदार चंद्रकांत पाटील? माघारीसाठी उरले दोन दिवस ; मुक्ताईनगरच्या जागेवरुन भाजप-शिवसेनेत वाद

Jalgaon DCC Bank Election : मुक्ताईनगरच्या जागेवरुन महायुतीचे घोडे अडले आहे. निवडणुकीत महायुती होणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी मुक्ताईनगरचा पेच सुटलेला नसून तो कायम आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.

निवडणुकीत भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती होणार, हे निश्‍चित झाले असले तरी चोपडा व मुक्ताईनगरच्या जागांवरुन पेच कायम आहे. मुक्ताईनगर, चोपडा, बोदवड या तीन्ही जागांवरील वाद दोन दिवसांत मिटेल असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला असून आम्ही महायुतीतर्फे २१ जागा लढविणार असल्याचं म्हटलं आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात दोन जागा आहेत. मुक्ताईनगर व बोदवड या ठिकाणांवरून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात वाद पेटण्याची चिन्हे आहेत. मुक्ताईनगर मतदारसंघात रक्षा खडसे यांच्या उमेदवारीसाठी भाजप आग्रही आहे. मात्र, त्याच जागेवर आमदार चंद्रकांत पाटील यांचाही दावा आहे. यात कोण माघार घेते, याकडे लक्ष लागून आहे. चोपडा, भडगाव, बोदवड येथील जागांबाबतही निर्णय बाकी आहे. दोन दिवसांत त्याबाबत निर्णय होऊन माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

मुक्ताईनगर सोबतच चोपड्याची जागा देखील भाजप मित्रपक्षांना सोडायला तयार नसल्याची माहिती आहे. गेल्या ५० वर्षांत चोपड्यात भाजपला एकदाही संधी मिळालेली नाही. मात्र, यंदा भाजपकडे ठराव जास्त असल्याने पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम यांच्यासाठी भाजपने या जागेवर दावा कायम ठेवला आहे. चोपड्याच्या जागेच्या बदल्यात राष्ट्रवादीच्या कोट्यातून चाळीसगावच्या माजी नगराध्यक्ष पद्मजा देशमुख यांना बिनविरोध निवडून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भाजपच्या बैठकीत युतीचा निर्णय

शुक्रवारी (दि. १३) रात्री उशिरापर्यंत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार अनिल पाटील, खासदार स्मिता वाघ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आदींची बैठक झाली. या बैठकीत महायुतीतर्फे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, काही महत्वाच्या जागांवरुन मित्रपक्षांपमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

पाचोऱ्यात ट्विस्ट

पाचोरा मतदारसंघातील राजकीय समीकरणांमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमीत पाटील यांचा उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरविला होता. तो अर्ज आता अपिलात वैध ठरविण्यात आला आहे. नाशिक विभागीय सहनिबंधकांनी सुनावणीनंतर हा निर्णय दिल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा चुरस निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीचा प्रस्ताव

दरम्यान बिनविरोध निवडणुकीसाठी प्रयत्न सुरु असून त्यावर महाविकास आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि उद्धव सेना या तिन्ही पक्षांना प्रत्येकी एक जागा मिळावी, असा प्रस्ताव मविआने ठेवल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT