Jalgaon District Bank Election; Girish Mahajan, MLA Kishore Patil, Gulabrao Patil And Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Bank : जळगाव जिल्हा बँकेत शिवसेनेच्या 'त्या' भूमिकेने महायुतीपुढे पॅनल निर्मितीचे संकट; काय आहे कारण?

MLA Kishore Patil Big Claim For District Bank : जळगाव जिल्हा बँकेत निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीच्या आधीच घडलेल्या घडामोडीवरून आता आरोप-प्रत्यारोप आणि वाद होत आहेत.

Sampat Devgire

MLA Kishor Patil News : जळगाव जिल्हा बँकेत उमेदवारी अर्ज बाद करण्यावरून मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. या संदर्भात आमदार किशोर पाटील यांनी सत्ताधारी नेत्यांवर अप्रत्यक्ष आरोप केले. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांना त्यावर खुलासा करावा लागला. आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. आता त्यावर सहकार उपनिबंधकांकडे दाद मागण्यात आली आहे. येथे न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा आमदार किशोर पाटील यांनी दिला. त्यामुळे शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये नवा राजकीय पेच निर्माण झाला आहे.

बँक निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारीची तारीख १७ नोव्हेंबर आहे. त्यावरून रोज नवे आरोप-प्रत्यारोप आणि वाद होत आहेत. महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजप नेत्यांमधील वादांमुळे पॅनल निर्मितीत अडथळे येतात की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

जळगाव जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ११ आमदार महायुतीचे आहेत. यामध्ये अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. उर्वरित दहा आमदारांमध्ये प्रत्येकी पाच शिवसेना (एकनाथ शिंदे गट) आणि भाजपचे आहेत. या १० आमदारांच्या मतदारसंघांच्या रचनेचा मुद्दा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वादाचे कारण ठरण्याची चिन्हे आहेत.

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, अमोल पाटील आणि चंद्रकांत सोनवणे या पाचही आमदारांच्या मतदारसंघांत दोन तालुके समाविष्ट आहेत. याउलट भाजपचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन (जामनेर), राजूमामा भोळे (जळगाव शहर), अमोल जावळे (रावेर), संजय सावकारे (भुसावळ) आणि मंगेश चव्हाण (चाळीसगाव) या आमदारांचे मतदारसंघ एकाच तालुक्यापुरते मर्यादित आहेत.

त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेत महायुतीचे पॅनल तयार करण्याची जबाबदारी गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील या युतीच्या दोन्ही मंत्र्यांवर अवलंबून आहे. त्यात आमदार किशोर पाटील यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाच्या पाचही आमदारांच्या मतदारसंघांत दहा तालुके, तर भाजप आमदारांचे मतदारसंघ पाच तालुक्यांपुरते मर्यादित असल्याचा दावा केला आहे.

या दाव्यामुळे पॅनल निर्मिती करताना शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षाचे हमखास जास्त उमेदवार असावेत, अशी अपेक्षा आहे. भाजपसाठी तो शिवसेना (शिंदे गट) पक्षाने टाकलेला मोठा राजकीय डाव आहे. त्यामुळे जळगाव जिल्हा बँकेत महायुतीचे पॅनल तयार करताना आमदार किशोर पाटील यांनी मतदारसंघाचे निमित्त करून टाकलेला चेंडू भाजपची अडचण करणारा ठरू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT