Jalgaon DCC Bank Election : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्या व केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या नावाचे ठराव मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी, कर्की आणि घोडसगाव येथील तीन स्वतंत्र विकास संस्थांकडून पाठविण्यात आले आहेत.
या तिन्ही ठरावांना मुक्ताईनगरचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप घेतला असून, त्याविरोधात त्यांनी थेट सहकार न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी सहकार न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत रक्षा खडसे यांच्या नावावर कर्की आणि कोथळी या दोन्ही गावांमध्ये शेतजमीन नसल्याचा दावा केला आहे. असे असतानाही नियम पायदळी तुडवत तीन स्वतंत्र विकास संस्थांमधून त्यांच्या नावाचे ठराव पाठविण्यात आल्याचे पाटील यांनी याचिकेत नमूद केले आहे. त्यामुळे मतदार यादीत एकाच व्यक्तीचे नाव तीन ठिकाणी नोंदविले जाण्याची शक्यता असून, त्यातून एका मतदाराला तीन वेळा प्रतिनिधित्व मिळण्याचा प्रकार घडू शकतो, असा आरोपही त्यांनी केला आहे.
मंत्री रक्षा खडसे यांच्या नावावर कर्की व कोथळी येथे कोणतीही शेती नसताना आणि दोन वर्षांच्या सभासदत्वाचे निकष पूर्ण होत नसतानाही तीन ठिकाणांहून नियमबाह्य ठराव करण्यात आले आहेत. या बेकायदेशीर ठरावांविरोधात सहकार न्यायालयात दाद मागितली असल्याचं आमदार चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना सांगितले. दरम्यान यासंदर्भात रक्षा खडसे यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.
सहकारी संस्थांच्या निवडणूक नियमांनुसार जिल्हा बँकेच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी ज्या प्राथमिक विकास संस्थेकडून ठराव करायचा आहे, त्या संस्थेचे संबंधित व्यक्तीने किमान दोन वर्षांपूर्वी कायदेशीर सभासदत्व घेतलेले असणे बंधनकारक आहे. संबंधित गावातील संस्थेमधून ठराव करण्यासाठी त्या व्यक्तीच्या नावावर त्याच गावात स्वतःची शेती असणे आवश्यक असते, असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
सुनावणीकडे लक्ष...
दरम्यान, ९ सप्टेंबर रोजी सहकार न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तीनही ठरावांना न्यायालय मान्यता देते की ते रद्द करते, यावर केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील भवितव्य तसेच आगामी राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत.
मुक्ताईनगरच्या राजकारणात केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सातत्याने चर्चेत राहिला आहे. सध्या दोघेही महायुतीत असले तरी दोघांमध्ये स्थानिक पातळीवर टोकाचा संघर्ष आहे.
स्थानिक निवडणुकांमध्ये दोन्ही गटांमध्ये अनेकदा मतभेद समोर आले आहेत. आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रक्षा खडसे यांच्या नावाने पाठविण्यात आलेल्या तीन ठरावांना चंद्रकांत पाटील यांनी सहकार न्यायालयात आव्हान दिल्याने हा संघर्ष पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.