Girish-Mahajan (3).jfif Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon MLC: नंदू महाजन जिंकताच भाजपमध्ये नवे सत्ता केंद्र उभे राहत असल्याची चर्चा?, जळगाव निकालानंतर गिरीश महाजन यांच्यासमोर नवे आव्हान

Jalgaon MLC BJP Nandkishore Mahajan won but this warning to Girish Mahajan-जळगावच्या भाजपमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यासाठी दुसऱ्या सत्ता केंद्राची धोक्याची घंटा

Sampat Devgire

Girish Mahajan News: जळगाव विधान परिषद निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे भाजपने खेचून आणला. पक्षाचे नंदकुमार महाजन एकतर्फी जिंकले. त्यात महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला. 

जळगाव विधान परिषद निवडणुकीत भाजपचे नंदकुमार महाजन यांना ६११ पैकी ५८२ मतदान झाले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे शरद तायडे यांना अवघी १७ मते मिळाली. त्यांच्या पक्षाच्या मतदारांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली. एक प्रकारे महाविकास आघाडीवर ही नामूशकीच म्हणावी लागेल. 

विधान परिषदेची निवडणूक जळगाव जिल्ह्यात वेगळ्या कारणाने गाजली. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला ही जागा हवी होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या पक्ष तुल्यबळ आहे, असे सांगत मुलाचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून शिंदे सेना विरुद्ध भाजप राजकीय वाद चांगलाच गाजला. 

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपची ही जागा हिसकावण्यासाठी शेवटपर्यंत झुंज दिली. त्यांच्या पक्षाचे सर्व आमदार त्यांच्या मदतीला धावून आले. मात्र गिरीश महाजन यांनी मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले. ही झुंज पाहता गुलाबराव पाटील आणि शिवसेना शिंदे पक्ष किती काळ आपल्या आकांक्षांना मुरड घालेल, हा नवा प्रश्न निर्माण झाला.

जळगाव जिल्ह्यात भाजपचे विविध सत्ता केंद्रांवर निर्विवाद वर्चस्व आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला सत्तेत सहभागी करून घेतले, त्यातून निर्माण झालेल्या अडचणी भाजपला सतत जाणवत आहेत. मात्र विधान परिषदेतून पक्षाचे सर्व सर्व गिरीश महाजन यांनाही आव्हान देण्याचा प्रयत्न झाला. -

विजयी झालेले भाजपचे नंदू उर्फ नंदकुमार यांची उमेदवारी सहजासहजी झाली नाही. गिरीश महाजन यांची पसंती माजी खासदार आणि काँग्रेस पक्षातून भाजपात आलेले डॉ उल्हास पाटील यांच्या कन्या डॉ केतकी पाटील ही होती. डॉ पाटील यांची केवळ उमेदवारी अर्ज दाखल करणे एवढीच औपचारिकता शिल्लक होती.

विधान परिषद उमेदवारीवरून पहिल्यांदा गिरीश महाजन यांना आव्हान देण्याचा प्रयत्न झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार राजू मामा भोळे आणि मंत्री संजय सावकारे यांनी या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली. नंदू महाजन हे या तिघांचे उमेदवार होते.

नंदकुमार महाजन यांची उमेदवारी म्हणजे जळगाव भाजप पक्षात नव्या सत्ता केंद्राची चाहूल मानली जाते. या तिन्ही नेत्यांनी गिरीश महाजन हे आमचे नेते आहेत असा निवडणुकीदरम्यान वारंवार उच्चार केला. राजकारणात अशी विधाने करण्याचा अर्थ काय होतो हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. 

त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत भाजपने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. मात्र त्यातून गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाला प्रतिस्पर्धी मात्र सहकारी असलेल्या शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष याबरोबरच भाजपमधील नव्या सत्ता केंद्राची चाहूल मानली जाते. सध्या तरी तशी पावले पडताना दिसत आहेत. कदाचित वरिष्ठ नेत्यांनाही त्याचा आनंद झाला नसावा ना? ही चर्चा ओघानेच येते. 

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT