Jalgaon MLC Election : जळगाव विधान परिषदेच्या एका जागेसाठी आता तब्बल १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सोमवारी (दि. १) तब्बल १६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यात महायुतीचे व महाविकास आघाडीचा प्रत्येकी एक अधिकृत व १४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. मंगळवार (दि. २) या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. त्यात सर्व १६ अर्ज वैध ठरले.
महायुतीकडून भाजपच्या नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यांचाही अर्ज वैध ठरला आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उबाठा पक्षाचे शरद तायडे हे मैदानात आहे. अशात अपक्ष उमेदवारांची वाढलेली संख्या महायुतीच्या उमेदवाराचे गणित बिघडवणारी ठरू शकते. विशेषतः भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचे बंधू अनिल चौधरी यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर अनपेक्षित आव्हान उभे राहिले आहे.
अनिल चौधरी यांची उमेदवारी कायम राहिल्यास महायुतीसाठी त्यांची उमेदवारी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. महायुतीकडून नंदकिशोर महाजन व महाविकास आघाडीचे शरद तायडे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. महायुतीचे पारडे जड असले तरी अनिल चौधरी यांची उमेदवारी महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा घात करु शकते अशी शक्यात वर्तवली जात आहे. त्यामुळे चौधरी यांना थोपवण्याचे आव्हान कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यापुढे आहे.
काही नाराज लोकप्रतिनिधी आणि स्थानिक गट हा अनिल चौधरी यांच्या सोबत असल्याची चर्चा आहे. त्याचा थेट परिणाम महायुती व महाविकास आघाडीने दिलेल्या अधिकृत उमेदवारांच्या मतांवर होऊ शकतो. विशेषतः महायुतीमधील अंतर्गत नाराजी आणि स्थानिक पातळीवरील गटबाजीमुळे मतांचे विभाजन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दुसरीकडे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात मैत्रीपूर्ण लढत अथवा बंडखोरी होणार नाही. महायुतीमध्ये ज्या पक्षाला जागा मिळालेली आहे, तोच पक्ष जागा लढवेल. आमच्याकडे चार दिवस आहेत. ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली आहे, त्यांना आम्ही अर्ज मागे घ्यायला लावू असा दावा महाजनांनी केला आहे.
असे, असताना ऐनवेळी जळगावातील शिंदेसेनेच्या नगरसेविका रेश्मा कुंदन काळे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांचाही अर्ज वैध ठरला आहे. महिलांना स्थान मिळावे, यादृष्टीने उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णयही त्यांनी बोलून दाखविला आहे. त्यांचीही उमेदवारी महायुतीसाठी डोकेदुखी ठरणार आहे.
उमेदवारी माघारीची मुदत ५ जूनपर्यंत आहे. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष या माघारीकडे लागले आहे. कारण त्यानंतर निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. गिरीश महाजन महायुतीमधील बंडखोरांचे आव्हान कसे थोपवता हे पाहावे लागेल. दरम्यान, मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावची जागा राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होईल, असा दावा केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.