Jalgaon MLC Election जळगाव विधान परिषदेच्या जागेवरुन शिवसेना शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील व आमदार किशोर पाटील यांच्या गटातच रस्सीखेच सुरु आहे. दोघांचेही आपल्या मुलांचे राजकीय लॉचिंग करण्यासाठीचे प्रयत्न सुरु असून जागेवर दावा केला आहे. मात्र, जळगाव विधान परिषदेची जागा सोडणार नाही अशी ठाम भूमिका भाजप आमदाराने घेतल्याने शिवसेनेच्या दोन्ही आमदारांचे स्वप्न भंग होण्याची शक्यता आहे. शिवाय स्वत : मंत्री गिरीश महाजन यांचीही नाशिक व जळगाव या दोन्ही जागा भाजपकडे असाव्या अशी मनोमन इच्छा असल्याचे सांगितले जात आहे.
भाजप आमदार सुरेश भोळे यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडत ही जागा भाजपचीच असून, ती सोडणार नाही, असा दावा केला आहे. शिवसेनेकडून ही जागा सोडण्याची मागणी होत असताना आमदार भोळे यांनी घेतलेल्या या भूमिकेने या जागेचा तिढा आणखी वाढला आहे. या जागेचा अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी आणि वरिष्ठ नेते घेतील असं सुरेश भोंळेंनी म्हटलं आहे.
भाजपकडे असलेली जळगावची जागा शिवसेना मागत असल्याने या जागेवर भाजप-शिवसेना आमनेसामने उभी ठाकली आहे. या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा केला आहे. राज्यातील १७ जागांसाठी निवडणुका होणार असून महायुतीमध्ये या जागा वाटपाचे सूत्र अद्याप निश्चित झालेले नाही. २६ मेपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असल्याने जळगावच्या राजकीय वर्तुळात हालचाली गतिमान झाल्या आहेत.
एकीकडे नाशिकची जागा भाजपला दिली जाईल व जळगावच्या जागा शिवसेनेला दिली जाईल, दोन्ही जागांमध्ये अदलाबदल करुन तिढा सोडवला जाईल असे बोलले जात आहे. मात्र, भाजपने या जागेवर भक्कम दावा केल्याने या अदलाबदलीची शक्यता कमी झाली आहे. शिवसेनेकडून जरी या जागेची मागणी होत असली तरी मात्र भाजपकडून या मागणीला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद मोठी आहे. महायुतीत सहकार्य असले, तरी प्रत्येक पक्ष आपापल्या जागांवर दावा करणारच. मात्र जळगाव विधानपरिषदेची जागा भाजपचीच राहील आणि पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला संधी दिली जाईल, असे भाजप आमदार सुरेश भोळे यांनी स्पष्टच सांगितलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.