Jalgaon Politics : जळगाव महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या नेतृत्वात जयश्री महाजन, माजी विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन यांच्यासह तब्बल १५ माजी नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गिरीश महाजन यांनी स्थानिक आमदारांचा विरोध डावलून हा प्रवेश घडवून आणला.
तब्बल वर्षभरापासून नितीन लढ्ढांच्या नेतृत्वात हे माजी नगरसेवक भाजपत जाणार असल्याची चर्चा होती. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे हा प्रवेश लांबला होता. अखेरीस मागच्या महिन्यात हा प्रवेश झाला. त्यानंतर काल महापालिकेच्या १९ प्रभागांमधील ७५ जागांचे प्रारुप आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यात नितीन लढ्ढा यांना दिलासा मिळाला असून ते प्रभागात सेफ राहिले आहेत.
प्रभाग क्रमांक ५ मध्ये दोन जागा सर्वसाधारण (अनारक्षित) तर एक जागा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने नितीन लढ्ढा व विष्णू भंगाळे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राखी सोनवणे यांनाही या प्रभागात एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने संधी मिळू शकेल. माजी महापौर भारती कैलास सोनवणे यांच्या पारंपरिक प्रभाग क्रमांक ४ मध्ये 'क' ची जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने त्या तिथून लढू शकतील.
प्रभागरचनेतील बदलामुळे माजी महापौर जयश्री महाजन व त्यांचे पती तथा माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांना प्रभाग क्रमांक १५ ऐवजी प्रभाग १४ मधून लढावे लागणार आहे. त्यातही आता प्रभाग क्र. १४ मध्ये दोन जागा सर्वसाधारण, एक ओबीसी व एक सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने महाजन दांपत्यांना संधी आहे. एवढच की प्रभाग बदलून त्यांना लढावे लागणार आहे. (Jalgaon News)
प्रभाग क्रमांक ७ मध्ये एक जागा ओबीसी महिला व सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने आमदार पत्नी सीमा भोळे यांचा प्रभाग सुरक्षित मानला जात आहे. याच प्रभागातून माजी उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे यांनाही अडचण असल्याचे दिसत नाही. प्रभाग क्रमांक १० मध्ये एक जागा सर्वसाधारण असल्याने माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासाठी सोयीचे आहे. सध्या कॉल सेंटर फसवणूक प्रकरणात कारागृहात असलेल्या माजी महापौर ललित कोल्हे यांच्या पारंपरिक प्रभाग क्रमांक ११ मध्ये प्रत्येकी एक जागा ओबीसी व सर्वसाधारण असून, एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे या प्रभागातून ते स्वत:, त्यांचा मुलगा पियूष व पत्नी सरिता माळी- कोल्हे यांनाही संधी मिळू शकेल.
याशिवाय नितीन बरडे, प्रशांत नाईक, लता भोईटे, मनोज सुरेश चौधरी, शरद तायडे, प्रतिभा देशमुख, ॲड. शुचिता हाडा, माजी उपमहापौर सुनील खडके, विश्वनाथ खडके, भगत बालाणी, जितेंद्र मराठे, सदाशिव ढेकळे यांच्यासारख्या प्रस्थापितांनाही आपापले प्रभाग सोयीचे आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.