Gulabrao Patil  Jalgaon Politics
Gulabrao Patil Jalgaon Politics  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon Politics : शिंदे गटातल्या दोन पाटलांमधील वाद चव्हाट्यावर!

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या जळगावमधील दोन नेत्यांची राजकीय कुरघोडी समोर येत आहे. यामुळे जळगाव मधील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao patil) व आमदार चिमणराव पाटील (Chimanrao patil) यांचे मतदार संघ जवळचे म्हणजे शेजारी शेजारी आहेत. यांच्यातील सुप्त राजकीय संघर्षाला धार चढत आहे.

गुलाबराव पाटील यांचा मतदार संघ जळगाव ग्रामीण तर चिमणराव पाटील यांचा मतदार संघ एरंडोल पारोळा. दोघेही शिवसेनेचे आमदार आहेत, शिवसेना फुटीत दोघे शिंदे गटासोबत आहेत. गुलाबराव पूर्वीपासूनच शिवसेनेत आहेत, चिमणराव पाटील नंतर शिवसेनेत आलेत. राज्यात युतीचे सरकार असताना वरिष्ठ म्हणून गुलाबराव पाटील यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतरही गुलाबराव पाटील यानाच संधी मिळाली, त्यामुळे चिमणराव पाटील नाराज झाले .याशिवाय निवडणुकीत आपल्याला पाडण्यासाठी विरोधकांना रसद पुरविली असा दोघाचा एकमेकांवर आरोप आहे.

चिमणराव पाटील यांच्या मतदार संघ म्हणजे एरंडोल मतदार संघ हा एकेकाळी गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात होता, त्यांच्यात पाडापाडीची अंतर्गत संघर्ष सुरू आहेच. शिवाय मंत्रिपद न मिळाल्याची सल चिमणराव पाटील यांच्या मनात असतानाच पारोळा, भडगाव, पाचोरा विभागाचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद हर्षल माने यांना देण्यात आले, हे पद आपला मुलगा अमोल याला मिळावे, अशी अपेक्षा चिमणराव पाटील यांची होती. मात्र ते मिळाले नाही. हे सर्व गुलाबराव पाटील यांनीच घडविले, असा कयास चिमणराव पाटील यांचा होता. त्यामुळे वादात मिठाचा खडा अधिकच पडला.

मंत्रिपद मिळाल्या नंतर निधी वाटपात गुलाबराव पाटील आपल्या मतदार संघावर अन्याय करतात, असे जाहीरपणे चिमणराव पाटील आरोप करतात. त्यातच आता माजी मंत्री व राष्ट्रवादी काँगेसचे नेते आणि पारोळा मतदार संघातील चिमणराव पाटील यांचे विरोधक डॉ. सतिश पाटील यांच्या गावात विकाससाठी गुलाबराव पाटील यांनी निधी दिला. या विकास कामाच्या शुभारंभ कार्यक्रमास गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील हजर होते. यामुळे चिमणराव पाटील यांनी जोरदार टीका केली. आता गुलाबराव पाटील जोरदार उत्तर देत आहेत.

शिंदे गटातील दोघात वाद सुरू झाल्यामुळे राज्यभर चर्चेचा विषय झाला आहे .मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोघांना शांत राहण्याचा सल्ला दिल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे हा वाद शमतो का अधिक वाढीला लागतो, तेच पहावयाचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT