Mangesh Chavan, Sumit Patil Dispute Jalgaon DCC Bank Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mangesh Chavan : 'टुकार मुलगा अन् त्याचा बाप, मंगेश चव्हाणांनी दोन मिनिटांची गोष्ट सांगत किशोर पाटलांना डिवचलं...

Mangesh Chavan Narrates Father-Son Story to Take a Dig at Kishor Patil : आमदार मंगेश चव्हाण यांनी एका गावातील बाप-लेकाची गोष्ट सांगत किशोर पाटील आणि त्यांचे पुत्र सुमित पाटील यांना अप्रत्यक्षपणे डिवचलं आहे.

Ganesh Sonawane

Mangesh Chavan Targets Kishor Patil Over Son Sumit Patil's Statement : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजप आमदार मंगेश चव्हाण आणि शिवसेना आमदार किशोर पाटील यांच्यातील वाद दिवसेंदिवस अधिकच चिघळत आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. त्यातच आता मंगेश चव्हाण यांनी एका गोष्टीचा दाखला देत किशोर पाटील आणि त्यांचे पुत्र सुमित पाटील यांना लक्ष्य केले आहे.

सुमित पाटील यांनी आक्षेपार्ह शब्दांत मंगेश चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी सुमित यांच्याशी थेट बोलण्याऐवजी किशोर पाटील यांच्याशी या विषयावर चर्चा करणार असल्याचे म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात किशोर पाटील यांनी आपल्या मुलाच्या वक्तव्याची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. यावरून मंगेश चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. किशोर पाटील यांनी सुमित यांच्या वक्तव्याचे समर्थन करायला नको होते, असे ते म्हणाले.

यावेळी चव्हाण यांनी एका गोष्टीचा दाखला देत किशोर पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. ते म्हणाले, "मी एक गोष्ट ऐकली आहे. त्या गोष्टीचे आणि या प्रकरणाचे किती साधर्म्य आहे, याचा तुम्हीच अंदाज लावा."

त्यानंतर त्यांनी एका गावातील बाप-लेकाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, "एका गावात एक टुक्कार मुलगा असतो. त्या मुलाच्या सततच्या तक्रारी गावातील लोक त्याच्या वडिलांकडे करण्याचे ठरवतात. त्यानुसार गावातील काही प्रमुख मंडळी त्या मुलाच्या वडिलांकडे जातात. मुलाला समजावून सांगा, अशी विनंती ते करणार होते. मात्र, वडिलांकडे गेल्यानंतर त्यांना वेगळेच चित्र दिसते. त्या मुलाचे वडीलच घराच्या छतावर उभे राहून लघुशंका करत असतात."

या गोष्टीचा दाखला देत चव्हाण यांनी ग्रामीण भागातील म्हणीचाही उल्लेख केला. "खाण तशी माती, बाप तसा बेटा आणि कुंभार तसा लोटा," असे म्हणत त्यांनी किशोर पाटील यांना टोला लगावला. त्यामुळे आता फार काही अपेक्षा करण्याची गरज वाटत नसल्याचेही चव्हाण म्हणाले.

दरम्यान, किशोर पाटील यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे मंगेश चव्हाण यांनी स्पष्ट केले. आपण हातपाय तोडण्याची भाषा केलेली नाही, असा खुलासाही त्यांनी केला. या संपूर्ण घटनेची क्रमवार माहिती (क्रोनॉलॉजी) नंतर पत्रकारांना सांगणार असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले.

मंगेश चव्हाण यांनी बाप-लेकाच्या गोष्टीचा दाखला देत किशोर पाटील यांच्यावर केलेली ही बोचरी टीका पाहता, जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सुरू झालेल्या या राजकीय संघर्षाला आता आणखी वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT