Shalarth ID scam Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shalarth ID scam : गुन्हे शाखेचा जळगावातील शाळेवर अचानक छापा ; चौकशीच्या भीतीने मुख्याध्यापक मागच्या गेटने फरार

Jalgaon School Raid : शालार्थ आयडी प्रकरणी जळगावात एसआयटी पथकाने धाडसत्र सुरु केलं आहे, चौकशीच्या भीतीने दोन शाळांचे मुख्याध्यापक फरार झाले. पथकाकडून अनेक महत्वाची कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहे.

Ganesh Sonawane

Shalarth ID scam Jalgaon : बनावट शालार्थ आयडी आणि बोगस भरती प्रकरणाच्या चौकशीला वेग आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी धाडसत्र सुरु केलं असून जळगाव जिल्ह्यातील अंतुर्ली आणि कुऱ्हा काकोडा येथील शाळांमध्ये अचानक धाड टाकली. पथक शाळेत पोहचल्याचे कळताच दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक चौकशीच्या भीतीने पसार झाले. या घोटाळ्यात कोट्यवधी रुपयांची शासनाची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बनावट शालार्थ आयडी प्रकरणात चौकशी सुरु असून बुधवारी (दि. २३) अंतुर्ली येथील शाळा, तर गुरुवारी (दि. २४) दुपारी साडेबाराला कुऱ्हा काडा येथील शाळेवर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अचानक छापा टाकला. पोलिसांनी प्रवेश करताच कुऱ्हा काकोडा शाळेचे मुख्याध्यापक मागील गेटने फरार झाले. पथकाने शाळेत सुमारे दोन तास कसून झाडाझडती घेतली आणि आवश्यक कागदपत्रांची पाहणी केली.

​या शाळांमध्ये ​खोटे रेकॉर्ड व बोगस ठराव तयार करणे, ​कर्मचाऱ्यांचे खोटे हजेरीपट बनविणे, ​१४ कर्मचाऱ्यांची बेकायदेशीर नियुक्ती व भरती प्रक्रिया, ​खोट्या संच मान्यतेद्वारे बॅक डेटने मान्यता मिळविणे, ​बेकायदेशीर शासनाकडून पगार लाटणे, ​या सर्व प्रकरणातून कोट्यवधी रुपयांची शासनाची फसवणूक झाली आहे.

बोगस शालार्थ आयडी घोटाळ्यात सुमारे ४० कोटींची उलाढाल झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. घोटाळ्यात आणखी किती जणांचा सहभाग आहे आणि एकूण किती रकमेचा गैरव्यवहार झाला आहे, याचा पर्दाफाश लवकरच होण्याची शक्यता आहे. संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी तालुक्यातून होत आहे.

शालार्थ आयडी प्रकरणात राज्यभरातील संशयित प्रकरणांची चौकशी सुरू आहे. त्यात ८४१ संशयित प्रकरणांपैकी तब्बल ६५० प्रकरणे एकट्या जळगाव जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे. दरम्यान, एसआयटीकडून विविध शाळा व संस्थांमधील नियुक्ती आदेश, सेवापुस्तिका, मंजुरी आदेश, पदनिर्मिती तसेच शालार्थ आयडीशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT