

Maharashtra Politics : SIR प्रक्रियेवरून पुन्हा एकदा देशभर राजकीय वादंग पेटलं असताना आता भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या मंत्री गिरीश महाजन यांनी एसआयआर प्रक्रियेवर आक्षेप घेणाऱ्या राज ठाकरे यांच्यासह विरोधकांवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एसआयआरची संपूर्ण प्रक्रियाच रद्द केली गेली पाहिजे असे म्हटले आहे. त्यावर मंत्री महाजन यांनी राज ठाकरे यांना सुनावलं असून राज ठाकरे यांच्या संदर्भात काय बोलावे, हेच आता मला कळत नाही, त्यांना एसआयआर बद्दल एवढा राग का आहे? असा प्रश्न महाजनांनी केला.
SIR च्या माध्यमातून जी डुप्लिकेट नावे आहेत ती कमी होत आहेत. अजूनही सर्वांना संधी आहे. अर्ज करा, फॉर्म भरा. मात्र, ते कोणाच्या आधारावर आक्षेप घेत आहेत? का रडत आहेत? लोक त्यांना निवडून देत नाहीत आणि त्यांच्या पाठीशी लोकांचा आधार नाही, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी केली.
काँग्रेस असो, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असो, हे सगळे काही ना काही वक्तव्य करत असतात. विरोधक हे विनाकारण उर बडवत आहेत. नाचता येईना अंगण वाकडे अशी त्यांची गत झाली आहे. बोगस मतांच्या आधारे आपण निवडून येऊ, असे त्यांना वाटत असेल तर ते चुकीचे आहे. जी मते कमी झाली ते काही कुठल्या पक्षाची किंवा कुणाच्या घरातील मते नाहीत. ज्यांनी फॉर्म भरला नाही, बीएलओंनी घरी भेट देऊनही जे आढळले नाही त्यांची नावे कमी झाली आहेत. तुम्हाला शंका असेल तर पुन्हा फॉर्म भरा, असा टोलाही त्यांनी लगावला.
दिवाळीनंतर मंत्रिमंडळात खांदेपालट?
मंत्रिमंडळात दिवाळीनंतर खांदेपालट होणार असल्याचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले होते, त्यावर बच्चू कडू यांनाच अधिकृत माहिती असेल. मला मंत्रिमंडळातील खांदेपालटाबाबत सध्या कोणतीही माहिती नाही, असा चिमटा गिरीश महाजन यांनी काढला.
बियाणे महाग, डिझेल महाग झाले आहे. पण शेतमालाला भाव नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते. त्यावर महाजन म्हणाले आमदार बच्चू कडू हे सध्या गोंधळलेले आहेत. त्यांना आपण सत्ताधारी पक्षात आहोत हे त्यांना कळत नाही. ते सत्तेत आहेत. त्यांनी हा विषय सरकारसमोर मांडला पाहिजे. शिंदे साहेबांशी ते बोलू शकतात, त्यामुळे प्रतिक्रिया देऊन सत्तेत नसल्यासारखे वागण्याची गरज नाही, असा टोलाही मंत्री महाजन यांनी कडू यांना लगावला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.