Jalgaon Politics : राज्यातील विधानसभा निवडणुकीला अद्याप वेळ असला तरी राजकीय पक्षांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा (SIR) कार्यक्रम गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) ने राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी समन्वयकांची नियुक्ती केली आहे. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांचाही समावेश आहे.
या नियुक्त्यांमध्ये पक्षाने अनुभवी नेत्यांना संधी दिली असून, दोन माजी मंत्र्यांसह माजी आमदार आणि पक्षातील अन्य पदाधिकाऱ्यांवर समन्वयकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या प्रक्रियेत पक्षाकडून संघटनात्मक पातळीवरही लक्ष केंद्रित केले जात असल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी एसआयआरच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांसाठी समन्वयकांची नियुक्ती केली आहे. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासोबतच आवश्यक दुरुस्त्या, नव्या मतदारांची नोंदणी आणि मतदार याद्यांशी संबंधित अन्य बाबींचा आढावा घेण्याची जबाबदारी या समन्वयकांवर सोपविण्यात आली आहे.
कोणाकडे कोणती जबाबदारी?
चोपडा विधानसभा मतदारसंघ- माजी आमदार कैलास पाटील
रावेर विधानसभा मतदारसंघ- भगतसिंग पाटील
भुसावळ विधानसभा मतदारसंघ- उमेश नेमाडे
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ- प्रतिभा शिंदे
जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ- माजी मंत्री गुलाबराव देवकर
अमळनेर विधानसभा मतदारसंघ- विक्रांत पाटील
एरंडोल विधानसभा मतदारसंघ-माजी मंत्री डॉ. सतीश पाटील
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ-योगेश देसले
पाचोरा विधानसभा मतदारसंघ- अभिलाषा रोकडे
जामनेर विधानसभा मतदारसंघ- नरेंद्र जंजाळ
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ- डॉ.सोपान दुट्टे
जळगाव जिल्ह्यातील या नियुक्त्यांमध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि माजी मंत्री डॉ. सतीश पाटील या दोन अनुभवी नेत्यांना देण्यात आलेली जबाबदारी विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. देवकर यांच्याकडे जळगाव ग्रामीण तर डॉ. सतीश पाटील यांच्याकडे एरंडोल विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवतानाच स्थानिक पातळीवरील पक्ष संघटनेशी समन्वय साधण्याची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागणार आहे.
एसआयआरची प्रक्रिया प्रशासनाच्या माध्यमातून राबविली जात असली, तरी मतदार यादीतील नावे, नव्या मतदारांची नोंदणी, स्थलांतरित मतदार तसेच दुबार किंवा चुकीच्या नोंदी याबाबत राजकीय पक्षांकडूनही बारकाईने लक्ष ठेवले जाते. त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी करण्यात आलेल्या समन्वयकांच्या नियुक्त्यांना राजकीयदृष्ट्याही महत्त्व आले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची ‘रंगीत तालीम’ म्हणून या नियुक्त्यांकडे पाहिले जात असले, तरी सध्या समन्वयकांची प्रमुख जबाबदारी एसआयआर प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविली जात आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याची आहे. पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहावीत, तसेच आवश्यक दुरुस्त्या वेळेत पूर्ण व्हाव्यात, यासाठी प्रशासन आणि पक्ष संघटनेदरम्यान समन्वय साधण्याचे काम या समन्वयकांना करावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.