BJP Vs NCP News: जामनेर नगरपालिका निवडणुकीतील राजकीय संघर्ष संपण्याची चिन्हे नाहीत. आज पुन्हा एकदा निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. त्यामुळे ही निवडणूक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.
जामनेर नगरपालिका निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी श्रीमती साधना महाजन बिनविरोध नगराध्यक्ष झाल्या. नगरपालिकेच्या नऊ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध झाले. मात्र हे बिनविरोध निवडणुकीचे नाट्य वेगळ्याच कारणाने वादात सापडले होते.
माघारीच्या दिवशी भाजपच्या कार्यकर्त्यांनी दबाव तंत्र वापरले. अक्षरशः विरोधी उमेदवारांची कॉलर पकडून माघार घेण्यास भाग पाडले. त्याचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाल्याने टीका झाली होती. सोशल मीडियावर त्याची चर्चा होती.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे तालुका अध्यक्ष उत्तम पाटील यांनी देखील माघार घेतली. उत्तम पाटील यांचे बंधू शिक्षण संस्थेत नोकरी करतात. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हे दबाव तंत्र वापरले गेले असा आरोप होता.
उत्तम पाटील निवडणुकीतून माघार घेताना रडत रडत निवडणूक कार्यालयातून बाहेर पडले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते दिलीप खोडपे यांनी त्यांना आधार दिला होता. त्यांची समजूत काढण्यात आली.
दुसऱ्याच दिवशी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दबाव तंत्र वापरल्याचा इन्कार केला होता. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे ॲड मोगरे यांनी भाजपची बाजू घेतली होती. भाजपने कोणतेही दबाव तंत्र वापरले नाही असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे मोगरे यांचे वक्तव्य वादात सापडले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गौरव खोडपे यांनीही भाजपचा दावा खोडला होता. त्यामुळे जामनेर नगरपालिका निवडणुका वादात सापडली होती. अशातच प्रचारालाही आरोप प्रत्यारोपांची जोड मिळाली.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज नाट्यमय घटना घडली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष व रडत रडत माघार घेणारे उत्तमराव पाटील यांनी हसत हसत गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या प्रवेशासाठी कोणी राजकीय जादूची कांडी फिरवली, कोणत्या शिक्षण संस्थेचा नेता सक्रीय होता, याची चर्चा आता रंगली आहे.
------
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.