Ahmednagar News: जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये म्हणून नगर-नाशिक जिल्ह्यांतून मोठा विरोध झाला. लोकप्रतिनिधींसह शेतकऱ्यांनी मागणी करत आंदोलने केली. जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये, अशी भूमिका तीव्रपणे समोर आल्यानंतरही आणि प्रकरण न्यायालयात असताना पाणी सोडले गेले, असे आरोप सरकारवर नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी केले. मात्र, मोठ्या विरोधानंतरही अखेर जायकवाडीला पाणी सोडण्यात आले.
नगर जिल्ह्यातील निळवंडे आणि मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी झेपावल्यानंतर आता जिल्ह्यातून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. नेवाशाचे आमदार, माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी एक महत्त्वाची मागणी जलसंधारण विभागाकडे केली आहे. समन्यायी कायद्याच्या माध्यमातून मुळा व भंडारदरा धरणातून मराठवाड्यातील जायकवाडीमध्ये पाणीसाठा सोडला जात आहे. मात्र, हे पाणी सोडत असताना मुळा व प्रवरा नद्यांवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरू द्यावेत, अशी मागणी गडाख यांनी जलसंधारण विभागाच्या नाशिक येथील मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याबाबतचे लेखी निवेदन गडाख यांनी दिले आहे. नगर जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात येऊ नये, यासाठी मोठा विरोध झाला होता. त्यानंतरही जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याचे आदेश दिले. लोकप्रतिनिधींनी एकत्र येत जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये, यासाठी ठराव पालकमंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन बैठकीत मांडला. मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर जायकवाडीला पाणी सोडण्यात आले.
जलसंपदा विभागाने जायकवाडी धरणासाठी धरण समूहातून पाणी सोडण्याचे प्रत्यक्ष आदेश शनिवारी दिले. त्यानंतर नगर जिल्ह्यातील निळवंडे आणि मुळा धरणातून जायकवाडीकडे पाणी सोडण्यात आले. तसेच नाशिकमधील दारणा, गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.
यंदा राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. सरासरीपेक्षा 13.5 टक्के पाऊस कमी पडल्याचे समोर आले आहे. नगर जिल्ह्यात पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्याच्यावरील धरण भागांमध्ये पाऊस झाल्याने धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होता. आगामी काळात पाण्याची गरज भासणार असल्याने जायकवाडीला पाणी देण्यास विरोध होऊ लागला. लोकप्रतिनिधींनीदेखील रस्त्यावर उतरत ठिकठिकाणी आंदोलनेदेखील केली.
मात्र, न्यायालयाच्या निर्णयानंतर जलसंपदा विभागाच्या आदेशाने अखेर जायकवाडीकडे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्यानंतर आता नेवाशाचे शंकरराव गडाख यांनीही पाणी सोडले असल्याने आता नदीपात्रामधील बंधारे भरू द्यावेत, अशी मागणी केली आहे. आता या मागणीकडे जलसंपदा विभाग कसा प्रतिसाद देते हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.