Laxman Mandale & Yogesh Gholap Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Laxman Mandale: संतप्त लक्ष्मण मंडाले म्हणाले, "जागा वाटपात माझा बळी दिला"

Deolali Assembly Constituency: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शहरातील जागा वाटपाबाबत चर्चेची मागणी केली.

Sampat Devgire

NCP Sharad Pawar News: महाविकास आघाडीचे जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा पूर्ण झाली आहे. मात्र यामध्ये उमेदवारी न मिळालेले नेते व त्यांचे समर्थक अस्वस्थ आहेत. देवळाली मतदारसंघात त्याची प्रतिक्रिया उमटली.

देवळाली विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात अगदी शेवटच्या क्षणी शिवसेना ठाकरे गटाला सोडावा लागला. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत देखील येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निवडून आले होते.

सर्व अनुकूलता असताना देवळाली मतदारसंघ सहकारी पक्षाला सोडण्यात आल्याचा धक्का पक्षाच्या पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांना बसला आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी मंडाले समर्थकांची बैठक पाथर्डी येथे झाली.

यावेळी मतदारसंघातील पक्षाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गेले वर्षभर पक्षाने सूचना केल्याने निवडणुकीची तयारी सुरू होती. कार्यकर्ते निवडणूक तयारीसाठी राबत होते.

ऐनवेळी जे जागावाटप झाले. तो केवळ अन्याय आहे. असा अन्याय या पुढच्या काळात होणार नाही, याची हमी कोण घेणार? महापालिका निवडणुकीतही अशीच दादागिरी होऊ शकते. त्यामुळे मग पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षासाठी काम करावे की नाही असा संभ्रम निर्माण झाला आहे.

यावेळी पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, यावेळी इच्छुक उमेदवार मंडाले यांनी पक्षाचे नेत्यांनी आपल्याला राज्यात सरकार आणायचे आहे. त्यासाठी दोन-चार जागांसाठी तडजोड करावी लागते. त्यामुळे आपण भविष्याचा विचार करावा, असे सांगितले.

प्रदेश अध्यक्षांनी देखील हा मतदारसंघ शेवटच्या क्षणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला गेल्याची खंत व्यक्त केली. त्यांनी उमेदवारी न दिल्यामुळे दिलगिरी देखील व्यक्त केली. मात्र या सर्व प्रकारांमध्ये माझा बळी देण्यात आला. गेली दहा वर्ष सातत्याने पक्षासाठी व मतदारसंघात पक्ष रुजविण्यासाठी काम केले होते. त्याचा काय फायदा झाला? असा प्रश्न त्यांनी केला.

यावेळी झालेल्या बैठकीत जोपर्यंत पक्षाचे वरिष्ठ नेते व्यक्तिशः सूचना करीत नाहीत तोपर्यंत महाविकास आघाडीच्या अथवा शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रचारात सहभागी व्हायचे नाही, असे निश्चित करण्यात आले. शहरातील नाशिक पूर्व, नाशिक मध्य आणि देवळाली या तिन्ही मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी एकत्रित बसून आगामी काळात जागावाटपाचे धोरण काय असेल? याविषयी चर्चा करून स्पष्टता करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

एकंदरच महाविकास आघाडीत जागा वाटपानंतर झालेल्या वादाचे पडसाद आता स्थानिक पातळीवर उंटू लागले आहेत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उमेदवारांना त्याची झळ बसण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीत समन्वय कसा निर्माण होणार अशी चिंता महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांना सत्तावू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT