Chandrashekhar Bavankule & Jayant Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chandrashekhar Bavankule: अमित शहा महाराष्ट्रात आल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांची घाबरगुंडी उडाली

Sampat Devgire

BJP Vs NCP News: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. आज त्यांनी नाशिक येथे उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक घेतली. यावर विरोधक आक्रमक आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांच्यावर खोचक टीका केली होती. शाह यांचा महाराष्ट्राचा दौरा म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वावर अविश्वास आहे, असे पाटील म्हणाले होते. त्याला भाजप नेते बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे.

श्री बावनकुळे यांनी अमित शहा यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि काँग्रेस घाबरते. श्री शाह भाजपच्या नेत्यांना काय कानमंत्र आणि निवडणूक जिंकण्याचे सूत्र सांगतात, याची दहशत विरोधकांमध्ये आहे.

केंद्रीय गृहमंत्री शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्याने भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारतो. कारण ते ऊर्जा देणारे नेते आहेत. २०१४ मध्ये श्री शाह महाराष्ट्रात आले. त्यानंतर भाजपला प्रचंड आत्मविश्वास मिळाला. पाहता पाहता राज्यातील निवडणुकीचे चित्र बदलले.

महाराष्ट्रात भाजप क्रमांक एकचा पक्ष झाला. ही दहशत विरोधी पक्षांवर अद्यापही कायम आहे. त्यामुळेच जयंत पाटील टीका करीत असतात. वस्तुतः अमित शाह यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांची घाबरगुंडी उडाली आहे. त्यामुळे ते उसने अवसान आणत आहेत.

बदलापूर घटनेतील संशयित अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झाला. याबाबत राज्य सरकारवर विरोधकांनी टीकेची झोड उठवली. या एन्काऊंटर विषयी उच्च न्यायालयाने देखील गंभीर प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे सत्ताधारी महायुती सरकार अडचणीत आहे का? याचा बावनकुळे यांनी इन्कार केला.

या संदर्भात बावनकुळे यांनी विरोधी पक्षांचा समाचार घेतला. ते म्हणाले, विरोधकांना गुन्हेगारांचे समर्थन करायचे आहे काय? विरोधकांची अवस्था दयनीय आहे. ते अप्रत्यक्षरीत्या गुन्हेगाराला पाठीशी घालत आहेत. राजकारणाचा स्तर अशाप्रकारे घसरता कामा नये.

महाविकास आघाडीचे हे अतिशय खालच्या पातळीवरचे राजकारण होत आहे. अशा घटनांमध्ये विरोधक आणि सत्ताधारी दोघांनीही एकत्र येऊन भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्र वाचवला पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही. उच्च न्यायालयाने जे प्रश्न उपस्थित केले असतील, त्याला पोलीस योग्य ते उत्तर देतील. विरोधी पक्षांनी एन्काऊंटर वरून राजकारण करणे थांबवावे

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर येथे काही लोक आम्हाला संपवण्यासाठी काम करीत असल्याचा आरोप केला होता. त्याला देखील बावनकुळे यांनी उत्तर दिले. श्री. ठाकरे हे मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे कटोरा घेऊन उभे आहेत. असे यापूर्वी कधी झाले नव्हते. भाजप शिवसेना युती असताना उद्धव ठाकरे यांच्यावर अशी वेळ कधीच आली नव्हती. त्यांनी हिंदुत्व सोडले. हिंदुत्वाविषयी त्यांची भूमिका आता संशयास्पद आहे. जाज्वल्य हिंदुत्वापासून दूर गेल्याने त्यांच्यावर अशी वेळ आली आहे.

------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT