Jitendra Awhad : kalaram mandir Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांनी संविधानाची प्रत ठेवली श्रीरामांच्या चरणी : विरोध जुगारून काळाराम मंदिरात दिली धडक!

kalaram Temple News : असा सनातन धर्म कुठून आला? आव्हाडांचा सवाल!

सरकारनामा ब्यूरो

Nashik News : नाशिक जिल्ह्यातील काळाराम मंदिरात आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणण्यास तेथील महंतांनी विरोध केला, असा खळबळजनक आरोप संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या पत्नी संयोगिताराजे यांनी केला होता. याबाबत सोशल मिडीयावर त्यांनी पोस्ट लिहली होती. यानंतर एकच वादंग उठले होते. आता यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) चांगलेच संतप्त झाले आहेत.

काळाराम मंदिराच्या गाभाऱ्यात आव्हाडांनी प्रभू श्रीराम चरणी देशाच्या संविधानाची प्रत ठेवली आहे. संयोगिताराजे यांच्यासोबत घडलेला प्रकाराचा त्यांनी निषेध नोंदवलेला आहे. असा सनातन धर्म कुठून आला, असं म्हणत त्यांनी जातीजातीत-धर्माधर्मात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप, त्यांनी केला.

बाबासाहेब आंबेडकरांनी समान वागणूक मिळावी या हेतूने ज्या काळाराम मंदिरात प्रवेशासाठी लढा दिला, त्याच मंदिरात जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांचा असलेला विरोधाला न जुमानता काळाराम मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी संविधानाची प्रत प्रभू श्रीरामांच्या चरणात ठेवली. प्रवेश करते वेळी त्यांच्यासोबत केवळ १५ लोकांना येण्याची परवानगी देण्यात आली होती.

संभाजीराजे काय म्हणाले ?

दरम्यान संभाजीराजे छत्रपती यांनीही यावर प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. संभाजीराजे म्हणाले,"संयोगिताराजे या नेहमी सत्याच्याच बाजू घेऊन बोलत असतात. जे त्यांना पटले नाही, ते त्यांनी परखडपणे बोलून दाखवले. नाशिकच्या काळाराम मंदिरात त्यांना जो अनुभव आला, तो त्यांनी जाहीरपणे मांडला. त्यांच्या परखडपणे व्यक्त होण्याचा मला सार्थ अभिमान वाटतो."

ते पुढे म्हणाले, "महाराष्ट्र राज्य हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना घेऊन चालणारे राज्य आहे. अशा महाराष्ट्रात अशी कृत्ये करणारे का निर्माण होत आहेत, तेच कळत नाही. प्रत्येकाला मंदिरात जाऊन दर्शन घेण्याचा अधिकार आहे. १०० वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराजांना आणि इतर ही महापुरूषांना जोत्रास दिला गेला, तोच प्रकार पुन्हा सुरू झाला आहे, यापुढे अशा गोष्टी पुन्हा घडू नयेत,” असेही ते म्हणाले.

काय आहे प्रकरण?

नाशिक जिल्ह्यातील काळाराम मंदिरात आपल्याला वेदोक्त मंत्र म्हणण्यास तेथील महंतांनी विरोध केला, असा खळबळजनक आरोप संयोजिताराजे यांनी केला होता.

“नाशिकच्या काळाराम मंदिरातील तथाकथित महंतांनी माझ्या पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याच्या वारशामुळे मी ठामपणे विरोध केला. अनेक कारणे देऊन त्यांनी मला वेदोक्त मंत्राचा अधिकार कसा नाही, हे सांगायचा प्रयत्न केला. शेवटी मी विचारले की, ज्या मंदिरांमध्ये तुम्ही आजच्या काळातही जे नियम लावत आहात, ती मंदिरे वाचविली कोणी? छत्रपतींनी वाचविली! मग छत्रपतींना शिकवण्याचे धाडस करू नका. पण तरीही मी महामृत्युंजय मंत्राचा जप का केला म्हणून त्यांनी प्रश्न केलाच,” असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.

122 वर्षांनंतर पुन्हा एकदा वेदोक्त प्रकरण चर्चेत :

वेदोक्त प्रकरण आता १२२ वर्षानंतर पुन्हा चर्चेत आले आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यास त्याकाळी विरोध झाला होता. याविरोधात शाहू महारांजांनी मोठा लढा दिला होता. शाहु महाराजांना झालेल्या या विरोधामुळे हा वाद, वेदोक्त प्रकरण वाद म्हणून प्रसिद्ध आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT