Namdeo Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Karjart Nagar Panchayat : नगरसेवक आणि लेखाधिकारी महिला यांच्यात खडाजंगी; दोघांच्या एकमेकांविरोधात तक्रारी

Corporator Aggressive : कर्जत नगरपंचायतीमधील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील वाद चव्हाट्यावर

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News :

नगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतीच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा या नगरसेवकाविरुद्ध लावण्यात आला आहे. नामदेव राऊत असे या नगरसेवकाचे नाव असून यापूर्वी नगराध्यक्षपद भूषवले आहे.

नामदेव राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आहेत. त्यांच्याविरोधात कर्जत (Karjat) नगरपंचायतीच्या लेखाधिकारी नयना कुंभार यांनी फिर्याद दिली आहे. नामदेव राऊतांनीही त्यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

कर्जत नगरपंचायतीच्या लेखाधिकारी नयना कुंभार (Nayana Kumbhar) काल (31 जानेवारी) दुपारी एक वाजता कार्यालयात काम करत होत्या. तेव्हा नामदेव राऊत तेथे आले. मी जे सांगेल तेच करायचे. कायदेशीर-बेकायदेशीर काही संबंध नाही. मी सांगेल तीच पूर्व दिशा, असे म्हणाले. यावेळी आपण त्यांना म्हटले की, बेकायदेशीर कुठलीही बिले काढली जाणार नाहीत. याचा राऊतांना राग आला आणि त्यांनी घाणेरड्या शिव्या देत दमदाटी केली, असा नयना कुंभार यांचा आरोप आहे.

एवढेच नाही तर त्यांनी सरकार कामात अडथळा आणला शिवाय चापटी मारून, उजव्या हाताला धरुन लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. काम करत असलेल्या टेबलपासून बाहेर ओढण्याचा प्रयत्न करताना मी कोणाला फोन करू नये आणि घटनेचे रेकॉर्डिंग करू, नये म्हणून फोन हिसकावून घेत फोडला, असा आरोप नयना कुंभार यांनी केला आहे. यावेळी उपस्थित असलेले नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल यांनी सुटका केल्याचेही कुंभार यांनी सांगितले.

बरे हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर, तू मला रस्त्यात दिस तुला मारून टाकीन, अशी धमकीही राऊतांनी दिल्याचा आरोप कुंभार यांनी केला आहे. यापूर्वी माझ्यावर 21 केसेस आहे. त्यात एक वाढली तर काय होईल? तुझा गेमच करतो म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. तुला कर्जतमध्ये काम करू देणार नाही. तसेच तुझी बदनामी करतो. म्हणजे तू येथून निघून जाशील, असे म्हणून राऊत कार्यालयातून निघून गेले, असे नयना कुंभार यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नामदेव राऊतांचा तक्रार अर्ज

नयना कुंभार या लेखा विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांना पत्राव्दारे चुकीच्या पद्धतीने उत्तर दिले. याबाबत विचारणा करण्यासाठी गेल्यावर कुंभार यांनी उद्धटपणे मला माहिती दिली. याचा जाब विचारला, तर कुंभार यांनी तुम्ही मला विचारणारे कोण ? तुमचा संबंध काय येतो? असे उलट उत्तर दिले. शिवाय मी याअगोदर ज्या-ज्या ठिकाणी काम केले आहे त्याठिकाणी अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्याच प्रकारचा गुन्हा तुमच्यावर सुद्धा दाखल करीन अशी भाषा वापरत धमकी दिली, अशी तक्रार नामदेव राऊत (Namdev Raut) यांनी केली आहे.

एवढेच नाही तर, मी ज्या-ज्या ठिकाणी काम केले आहे तेथे माझ्या नादी कोणी लागले नाही. त्यामुळे तुम्ही मला अशा पद्धतीची कुठलीही माहिती विचारायची नाही. तुमच्याकड़े वेगळ्या प्रकारच्या भाषेत बघून घेईल, अशी धमकी कुंभार यांनी दिली असल्याची तक्रार अर्ज नामदेव राऊत यांनी कर्जत पोलिसांत दिली आहे.

संबंधित व्यक्तीच्या विरोधात अरेरावीची भाषा करून खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याबाबत गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी तक्रार अर्जात नामदेव राऊत यांनी केली आहे.

दोन्ही बाजूंनी तक्रारी गेल्यामुळे आता पोलिस या प्रकरणाचा कसा तपास करणार, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT