Eknath Khadse-Rohini Khadse-Gulabrao Deokar
Eknath Khadse-Rohini Khadse-Gulabrao Deokar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अध्यक्षपदासाठी रोहिणी खडसेंचे नाव पुढे आले; पण...

कैलास शिंदे

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी कोणाची वर्णी लागणार यांची चर्चा होती. विशेषत: अध्यक्षपदासाठी अधिक जण इच्छुक होते. त्यामुळे कोणाच्या गळ्यात माळ पडणार याबाबत उत्सुकता होती. जिल्हा बँकेच्या अध्यक्षाच्या दालनात एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (NCP) संचालकांची बैठक झाली. नावाबाबत बराच उहापोह झाला. अध्यक्षपदासाठी नवीन चेहऱ्याला संधी देण्यात यावी, असे ठाम मत राष्ट्रवादीच्या संचालकांनी लावून धरले. अखेर गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांच्या नावाची सूचना एकनाथ खडसेंनी केली अन्‌ सर्वांनी सहमती दर्शविली. ही माहिती सभागृहाबाहेर समजताच एकच जल्लोष झाला. (Khadse suggested Gulabrao Deokar's name for the post of Chairman of Jalgaon District Bank)

जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने २० जागा जिंकत बहुमत मिळविले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक १०, शिवसेनेने ७ तर कॉंग्रेसने तीन, अपक्षाने एक जागा जिंकली आहे. महाविकास आघाडीने ठरविलेल्या फॉर्म्युल्यानुसार पहिल्या तीन वर्षांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा अध्यक्ष होणार हे निश्चित होते. मात्र, पक्षातर्फे पदासाठी विद्यमान अध्यक्ष ॲड. रोहिणी खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील व रवींद्र पाटील यांचे नाव चर्चेत होते. मात्र अंतिम क्षणी रोहिणी खडसे व गुलाबराव देवकर यांच्यापैकी कुणाला अध्यक्षपद मिळणार, याबाबत उत्सुकता होती.

अध्यक्षपदाच्या नावाबाबत अखेर सहमती

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय होणार होता. एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू झाली तेव्हा विद्यमान अध्यक्ष रोहिणी खडसे यांना पुन्हा एक वर्षासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव पुढे आल्याचे सांगण्यात आले. मात्र, पक्षातील इतर संचालकांमध्ये नवीन व्यक्तीला संधी देण्याचा सूर दिसून आला. पदाचे प्रमुख दावेदार गुलाबराव देवकर यांनी आपल्याला संधी मिळावी, असे ठाम मत व्यक्त केले. डॉ. सतीश पाटील यांनीही नवीन संचालकास संधी देण्याचे आग्रहाने ठाम सांगितले. यावेळी तीन वर्षात एक- एक वर्षासाठी संधी द्यावी, असे मतही संचालकांनी व्यक्त केले. त्याला सहमती दर्शविण्यात आली. अखेर पक्षाचे ज्येष्ठ संचालक एकनाथ खडसे यांनी अध्यक्षपदासाठी गुलाबराव देवकर यांचे नाव सूचविले. त्याला एकमताने मंजुरी देण्यात आली. त्यांतर एकच जल्लोष करण्यात आला. या निवडीनंतर पक्षाचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या निवडीची माहिती देण्यात आली.

उपाध्यक्षपदासाठी सोनवणेंचे नाव

जिल्हा बँकेचे उपाध्यक्षपद शिवसेनेकडे आहे, त्यामुळे शिवसेनेतर्फे त्यांचे नाव जाहिर करण्यात येणार होते, या पदासाठी अमोल पाटील, श्‍यामकांत सोनवणे व मेहताबसिंग नाईक यांची नावे चर्चेत होती. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी श्‍यामकांत सोनवणे यांचे नाव सूचविले व त्यांच्या नावाला एकमताने सहमती दर्शविण्यात आली.

खडसेंचे नेतृत्व अन्‌ ‘राष्ट्रवादी पुन्हा’

जळगाव जिल्हा बँकेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतृत्व होते. मात्र, गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने वर्चस्व निर्माण केले होते. भाजपच्या रोहिणी खडसे अध्यक्ष झाल्या होत्या. परंतु कालांतराने खडसे यांनी भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी खडसे यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशी महाविकास आघाडीचे सहकार पॅनेल करण्यात आले. बॅंकेच्या २१ पैकी २० जागा पॅनेलच्या निवडून आल्या, त्यातही राष्ट्रवादी कॉंग्रेसला अधिक जागा मिळाल्या अन्‌ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा अध्यक्ष झाला. जिल्हा बँकेत ‘राष्ट्रवादी पुन्हा’असा गजर झाला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT