Kishor Patil
Kishor Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

किशोर पाटील ठरणार शिंदे मंत्रीमंडळातील जळगावचा नवा चेहरा!

Sampat Devgire

नाशिक : किशोर पाटील (Kishor Patil) यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे (Eknath Shinde) असलेले गुडवील अन् समन्वय साधण्याची किमया, नवीन चेहरा, सर्वसामान्यांशी असलेली बांधिलकी यामुळे त्यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडू शकते. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील नव्या नेतृत्त्वाची ही नांदी ठरु शकते. भाजपाच्या जुन्या जाणत्या नेत्यांसह किशोर पाटील यांच्या रुपाने नेतृत्त्वाचा नवा चेहरा जिल्ह्याला लाभू शकतो. (MLA Kishor Patil will be the new face for Jalgaon Politics)

राज्यात सरकार स्थापन झाले, आता मंत्रिमंडळात स्थान कोणाकोणाला? याबाबत राजकीय वर्तुळात खलबते सुरू आहेत. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटातून कोणाची वर्णी लागेल, याची चर्चा सर्वाधिक आहे. उत्तर महाराष्ट्रतून (Jalgaon) तरूण आणि उमदा चेहरा म्हणून पाचोरा-भडगावचे आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांचे मंत्रिमंडळात स्थान पक्के असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

संभाव्य मंत्रिमंडळाबाबत सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. उत्तर महाराष्ट्राचा (नगर सोडून) विचार केला तर शिंदे गटाकडून गुलाबराव पाटील यांचे नाव पुढे येते. त्यांच्याबरोबर पाचोरा-भडगाव मतदार संघाचे आमदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे मानले जाणारे किशोर पाटील यांचेही नाव नवीन चेहरा म्हणून सध्या आघाडीवर आहे.

आमदार किशोर पाटील यांचे संभाव्य मंत्रिमंडळात नाव आघाडीवर असल्याचे राजकीय सूत्रांकडून सांगितले जात आहे. धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. डॅशिंग स्वभाव आणि लोकांचे प्रश्न तत्काळ जागेवर सोडविण्याची तत्परता त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळवून देऊ शकते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत भाषणातून आता थांबायचे काम नाही. तत्काळ कामे मार्गी लावण्याबाबत सुतोवाच केले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना अभिप्रेत असलेले काम आमदार किशोर पाटील करत असल्याने त्यांचे पारडे जड आहे.

तरूण नेतृत्वाला हवे प्राधान्य

जळगाव जिल्ह्यात सेनेचा विचार केला तर गुलाबराव पाटलांना गेल्या भाजप-सेना युतीच्या काळात राज्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर महाविकास आघाडीत ते कॅबिनेट मंत्री झाले. मात्र मतदारसंघ सोडून इतरत्र फिरतांना ते दिसून आले नाहीत. पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या नुकत्याच बाहेर आलेल्या ऑडिओ क्लीपची चर्चा देखील सध्या आहे. गुलाबराव-चिमणराव हे तसे पक्षांतर्गत विरोधक मानले जातात. चिमणरावांच्या तुलनेत गुलाबराव पाटलांच्या पारड्यात मंत्रीपदाची शक्यता अधिक आहे. मात्र जिल्ह्यात पालेमुळे रोवायची झाल्यास किशोर पाटलांसारखा जनतेशी नाळ ओळखणारा नेता शिंदे सरकारसाठी उपयुक्त ठरु शकतो. सर्वाशी समन्वय ठेवणारा दुवा म्हणून किशोर पाटील यांची निवड होऊ शकते.

किशोर पाटलांच्या रूपाने नवीन चेहरा लाभल्यास विस्ताराची मोठी संधी जिल्ह्यात आहे. ते तरुण असल्याने तरूणवर्ग शिंदेगटाशी जोडला जाऊ शकतो. उत्तम संघटन कौशल्य आणि अभ्यासू वक्ते या त्यांच्या आणखी जमेच्या बाजू आहेत. शेतकऱ्यांच्या विषयी सभागृहातील त्यांची कळकळ अनेकदा दिसून आली आहे. मतदारसंघासह जळगाव शहरातही प्रभाव असल्याने त्याचा फायदा शिंदे गटाला होणे शक्य आहे. मतदारसंघातील विकासकामे त्यांची जमेची बाजू आहे.

राजपूत समाजाचा चेहरा

राज्यात १०-१२ टक्के राजपूत समाज आहे. एकनाथ शिंदेच्या गटाकडे किशोर पाटलांच्या रूपाने एकमेव राजपूत समाजाचे आमदार आहेत. त्यामुळे राजपूत समाजाकडूनही किशोर पाटलांना मंत्रीपद मिळण्याची मागणी जोर धरत आहे. त्यांना मंत्रीपद दिल्यास राज्यातील राजप़ूत समाजाचा विचार नव्या सरकारने केला, असा संदेश जाईल. पर्यायाने हा समाज शिंदे गटाकडे आकृष्ट होईल, असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT