Kishor Patil On Vaishali Suryavanshi : पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार किशोर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेल्या वैशाली सूर्यवंशी यांच्यावर अखेर बोचऱ्या शब्दात टीकेचे बाण सोडले आहेत. वैशाली सूर्यवंशी या त्यांच्या चुलत बहिण असून एकमेकांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवल्याने दोघांमधील संबंध अधिक ताणले गेले होते. त्यात आता शिवसेना ठाकरे गट सोडून भाजपत आलेल्या वैशाली सूर्यवंशींना किशोर पाटलांनी डिवचलं आहे.
जळगाव जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली असताना वीस दिवसांपूर्वी वैशाली सूर्यवंशी यांनीही भाजपत प्रवेश केला. दरम्यान आपल्या पक्षांतराविषयी मतदारसंघात गैरसमज पसरविले जात असल्याचं म्हणत त्यांनी भाऊ किशोर पाटील यांच्यावर टीका करत बरेच गंभीर आरोपही केले. त्यावेळी किशोर पाटलांनी काही प्रत्युत्तर दिलं नव्हतं. मात्र अखेर किशोर पाटलांचा संयम तुटला असून त्यांनी भाजपत प्रवेश करणं म्हणजे हा वैशू ताईंचा बालिशपणा असल्याची टीका केली आहे.
वैशाली सूर्यवंशींना प्रवेश देऊन भाजपने तुमची नाकेबंद केली का असं पत्रकारांनी विचारलं असता पाटील म्हणाले, माझ्या बहिणीला प्रवेश देऊन भाजपने मला कोणत्याही अडचणीत आणलेलं नाही. उलट आता पाचोऱ्यात विरोधी पक्षच शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे आमची महायुती आणखी मजबूत झाली आहे.
किशोर पाटील पुढे म्हणाले, वैशाली सूर्यवंशी यांना उबाठात येऊन तीन वर्ष झाली असतील. तीन वर्षापूर्वी जी वैशू ताई माझ्यावर प्रचंड आरोप करायची, मीच उबाठाची तारणहार आहे असं दाखवलं. विधासभा निवडणूक लढवली. मतदारसंघातल्या ६० हजार लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला पण अवघ्या आठच महिन्यात पक्षांतर करुन मतदारसंघातील साठ हजार लोकांचा विश्वास घात केला असा घणाघात किशोर पाटलांनी केला.
ज्या काळात कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे, अशा काळात त्यांनी पक्ष सोडला. त्यामुळे त्यांना निवडणुकीत ज्यांनी साथ दिली अशा सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. वैशु ताईंच्या पक्षांतराच्या या निर्णयाला मी त्यांचा राजकीय बालिशपणा समजतो. यात फक्त आप्पाचा द्वेष आणि दुसरं म्हणजे बालिशपणा या दोनच गोष्टी आहे.
आता भाजपत एकाच ठिकाणी तीन आमदारकीचे उमेदवार झाले आहेत. दिलीप भाऊ आमदारकीचे उमेदवार आहे. अमोल भाऊ आमदारकीचे उमेदवार आहे, आता वैशु ताई आमदारकीची उमेदवार आहे. आता या जर तीन्ही मेन लाईन असतील आणि लाईट लावायचा असेल तर आर्थिंन्ग लागते. तीन्ही मेन लाईन जर अशाच एकत्र राहील्या तर फटाफट तारा तुटतील अन् शॉर्टसर्किट होईल असं पाटील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.