Ahilyanagar News : विधानसभा निवडणुकांचा निकाल रोमांचक पद्धतीने लागला. चोख नियोजन आणि मुत्सद्देगिरी यावर अवलंबून असणारी ही निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडीची परीक्षा जशी ठरली, तशी उमेदवारांच्या निष्ठेची देखील परीक्षा ठरली. भाजपने या निवडणुकीत खेचूण आणलेला विजयश्री, त्यासाठी घेतलेली मेहनत अन् केलेले बेरजेचे राजकारणावर आता विरोधक आणि राजकीय विश्लेषकांचे संशोधन होत राहणार आहे.
परंतु आता चर्चा आहे ती, निवडणुकीपूर्वी भाजपने त्यांच्या निष्ठावानांना बंद खोलीत दिलेल्या शब्दांची! या निवडणुकीत भाजपने कोपरगावात तीन पिढ्यांचा राजकीय संघर्ष असणारे कोल्हे-काळे कुटुंब चक्क एकत्र आणले. यात सर्वात महत्त्वाचा आयाम ठरला तो, कोल्हे यांच्या भाजप निष्ठेचा!
कोपरगाव मतदारसंघ राष्ट्रवादी पक्षासाठी सोडणे किंवा मैत्रीपूर्ण लढत करून पुढे जाणे, असे पर्याय महायुती समोर होते. परंतु खात्रीशीर निवडून येणारी जागा युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नावाने गृहीत धरली जात होती. विवेक कोल्हे या युवा नेतृत्वाकडे महाविकास आघाडीतील (MVA) सर्वच पक्षाकडून चाचपणी झाली. 2019च्या निवडणुकीत त्यांच्या मातुश्री स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या 822 मतांनी पराभव झाला होता. हा पराभवाचा वचपा घेण्यासाठी विवेक कोल्हे मतदारसंघ स्वतः उतरले आणि एकहाती खेचून आणता येईल, अशी बांधणी केली होती.
नाशिक शिक्षक निवडणुकीत विवेक कोल्हे यांनी पाच जिल्ह्यात अवघ्या वीस दिवसांत उभी केलेली यंत्रणा राज्याचे लक्ष वेधून घेणारी ठरली. त्यापूर्वीच्याही त्यांच्या राजकीय भूमिका उल्लेखनीय ठरल्या. कोल्हे यांची ही बेरजीची राजकीय समीकरणे भाजपने हेरले. त्यामुळे कोल्हे यांना पक्षातच ठेवण्याची तयारी भाजपने (BJP) केंद्रीय पातळीवर सुरू केली. यासाठी भाजपचे निरीक्षक केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घेतला. स्नेहलता कोल्हे आणि त्याचे पुत्र विवेक कोल्हे यांच्याशी यशस्वी राजकीय बांधणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट या मायलेकरांना अमित शाह यांच्याशी भेट घडवून आणली. कोल्हे मायलेकरं दिल्लीत थेट भाजप पक्षाच्या श्रेष्ठींसमवेत बैठकीला बसल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रस्थापितांमध्ये देखील धक्का बसला. यानंतर कोल्हे परिवाराने गेल्या 50 वर्षात पहिल्यादांचा निवडणुकीत थांबवण्याचा निर्णय घेतला.
कोल्हे थांबले, पण कार्यकर्त्यांना त्यांचा हा निर्णय पचनी पडेना. कोल्हे नाही, तर काळे नको, असा सूर असणारा वर्ग वाढला. गिरीश महाजन यांनी फराळ कार्यक्रमास उपस्थिती राहून कार्यकर्त्यांना कोल्हे यांच्यासाठी पक्षाने मोठा विचार केल्याचे सूतोवाच केले. यानंतर नेते देवेंद्र फडणवीस यांनी एका व्हिडिओद्वारे विवेक कोल्हे यांच्या आगामी राजकीय वाटचालीवर मोठं भाष्य केले. यातच कोल्हे कारखाना गळीत हंगामाचा प्रारंभात बिपीन कोल्हे आणि विवेक कोल्हे यांनी आपल्या रक्तात गद्दारी नाही, जो शब्द दिला तो जपणे आपले काम आहे. सर्वांनी घड्याळाला कमळ समजून मतदान करा, असे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार आमदार आशुतोष काळे यांच्या हक्काच्या माहेगाव, सुरेगाव, कोळपेवाडी या गावापेक्षाही अधिकचे मताधिक्य कोल्हे यांनी शिंगणापूरसह आपल्या हक्काच्या गावातून दिले. काळे गटाच्या 38 ग्रामपंचायतमधे 78.71%, तर कोल्हे गटाच्या ताब्यातील 34 ग्रामपंचायतमध्ये 79.69% मतदान काळे यांना मिळवून देण्यात कोल्हे यांचा सिंहाचा वाटा ठरला. काळे यांच्या ग्रामपंचायतीत मताधिक्याची टक्केवारी 79.46% तर कोल्हे यांच्या ताब्यातील ग्रामपंचायतमध्ये 80.84% मताधिक्याची आकडेवारी दिसून येते.
कोल्हे यांनी आपली पूर्ण ताकद काळे यांना दिल्याने त्यांना राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेणाऱ्या पहिल्या पाचमध्ये आणून दाखवले. तर सर्वाधिक एकूण मतदान 1 लाख 61 हजार 147 मिळवणारे देखील कोपरगाव वरच्या फळीत आले. युतीचे काम होवूनही काही मतदारसंघात मताधिक्य आणि विजयाच्या जवळ जावून जागा निसटल्या गेल्या. तसे कोपरगावमध्ये घडले नाही. पुण्यातील वडगाव शेरी राष्ट्रवादी अजित पवार यांचे सुनील टिंगरे पराभूत झाले. तिथे शरद पवार यांचे बापूसाहेब पठारे निवडून आले. या ठिकाणी भाजपचे जगदीश मुळीक यांनी तयारी केलेली होती. त्यांनीही वेळेवर युतीचा धर्म पाळला मात्र ती जागा पराभूत झाली.
हडपसर मतदारसंघ अजितदादांचे चेतन तुपे सात हजार मतांनी विजयी झाले. तिथे भाजपचे योगेश टिळेकर यांनी युतीधर्म जपला. मात्र तिथं मताधिक्य मात्र फार आहे. तुलनेत कोपरगाव मात्र विक्रमी मताधिक्य काळे यांना मिळाले आहे. आता कोल्हे यांच्या बाबतीत भाजप कशावर शिक्कामोर्तब करणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.