Kumbh Mela scam accused relative of Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Kumbh Mela Scam : कुंभमेळ्यातील बनावट वर्कऑर्डर प्रकरणी महाजनांच्या गावातून आणखी तीनजण ताब्यात, पोलिसाचं पथक थेट संशयितांच्या घरी...

Kumbh Mela fake work order : जामनेरचे आणखी ७ ते ८ जण नाशिक पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी आणखी तिघांना ताब्या घेतलं आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रुतली असून रॅकेट उघड करण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे.

Ganesh Sonawane

Nashik Kumbh Mela fake work order : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी राज्यभरातून बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना 70 दिवसांसाठी सोयी-सुविधा पुरविण्यासाठीच्या बनावट एक हजार 311 कोटींच्या निविदांचा कार्यारंभ आदेश (वर्कऑर्डर) खरा असल्याचे भासवून छत्रपती संभाजीनगर येथील कंत्राटदारांना तब्बल साडेतीन कोटींना गंडा घातल्याप्रकरणी चक्क कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या नातेवाईक असलेल्या तनय अनंत महाजन याला अटक झाल्याने खळबळ उडाली आहे.

याप्रकरणात तनय अनंत महाजन (वय २२), नरेंद्र तोताराम महाजन (५१, दोघे रा. जामनेर, जि. जळगाव), नदीम शेख अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघांना सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात तब्बल 591 कोटी रुपयांच्या पाच कामांचे बनावट कार्यारंभ आदेश तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्या आधारे संबंधितांकडून पैसे उकळण्यात आले.

सिंहस्थ कुंभमेळ्यातील कामांच्या बनावट वर्कऑर्डर घोटाळ्याच्या गुन्ह्याची व्याप्ती वाढताना दिसत आहे. जामनेरचे आणखी सात ते आठ जण नाशिक पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरमधून आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खोलवर रुतली असून या गुन्ह्यात आणखी किती मासे अडकतात ते पाहावे लागणार आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, यात धुळे कनेक्शन समोर आले आहे. धुळे येथील शकील शेख नावाच्या एका शिक्षकाने त्याच्या काही मित्रांना मोबाइलच्या माध्यमातून युपीआयद्वारे काही रक्कम पाठवली होती. त्यावरून गुरुवारी नाशिक पोलिसांच्या पथकाने जामनेरात संबंधितांच्या घरी जाऊन चौकशी केली.

ही रक्कम घेणाऱ्यांमध्ये माजी नगरसेवक, त्यांचे पुत्र, काही ठेकेदार व व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या रकमेतून काहींनी सोने खरेदीत गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिक पोलिसांनी सुरुवातीला संशयितांशी मोबाइलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु काहींचे मोबाइल बंद होते. त्यामुळे पथकाने त्यांचे घर गाठत प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली. त्यातील एका संशयिताच्या मुलासह तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

बनावट वर्कऑर्डर प्रकरणातील संशयित शकील शेख याने मंत्र्यांच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन ठेकेदारांना कुंभमेळ्याचा ठेका मिळवून देण्याचे आमिष दाखवले आणि बनावट वर्कऑर्डर तयार केली. नंतर ठेकेदारांकडून मोठी रक्कम मिळवली. या ठेकेदारांच्या तक्रारीवरून त्याला तीन दिवसांपूर्वीच नाशिकच्या पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

चौकशीत पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत संशयितांना बोलते केले असून मिळालेली रक्कम कुणाकुणाला कोणत्या माध्यमातून दिली, याची माहिती घेतली. त्याने शहरातील ७ ते ८ जणांना लाखोंची रक्कम दिल्याची माहिती दिली. ही रक्कम घेणाऱ्यांच्या शोधासाठी विशेष पथकाने गुरुवारी जामनेरमध्ये शोधमोहीम राबवली. पोलिसांनी थेट संबधितांच्या घरी जाऊन चौकशी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT