Maharashtra politics : गेल्या 70 वर्षांपासून काँग्रेस पक्ष व गांधी घराण्याशी एकनिष्ठ असलेलं धुळ्यातील पाटील घराणं फोडण्यात भाजपला यश आलं आहे. माजी आमदार कुणाल पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला आहे. पाटील यांना आपल्या गळाला लावून भाजपने धुळे जिल्हा कॉंग्रेसमुक्त करण्याचं बघितलेलं स्वप्न पूर्ण केलं आहे.
कुणाल पाटील हे कॉंग्रेस सोडणार हा विचारही कधी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींच्या मनात आला नसेल इतकी या कुटुंबाची नाळ पक्षाशी जुळलेली होती. कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील तब्बल 70 वर्ष कॉंग्रेससोबत होते. खान्देशात त्यांनी पक्षाचं मोठं काम उभ केलं होतं. उत्तर महाराष्ट्रातील कॉंग्रेसचे मोठे नेते म्हणून त्यांची ओळख होती. कॉंग्रेसच्या काळात त्यांनी विविध खात्यांचे मंत्रिपद भुषवलं होतं. स्वत:राजीव गांधी यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. पुढे सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशीही त्यांनी हे संबंध व घरोबा कायम ठेवला. 2024 मध्ये राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान रोहिदास पाटील यांची त्यांच्या निवास्थानी जावून भेट घेतली होती.
स्वत: कुणाल पाटील व राहुल गांधी यांचेही चांगले संबंध आहेत. गांधी घराण्याशी चांगले संबंध व राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून कुणाल पाटील यांच्याकडे बघितलं जातं. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला धुळे लोकसभेची जबाबदारी कुणाल पाटील यांनी घेतली होती. ती जागा निवडून आणल्याबद्दल त्यांचा सत्कारही झाला होता. मग नेमकं असं काय झालं की कुणाल पाटील यांनी भाजपची वाट धरली हा प्रश्न कॉंग्रेस पक्षासह उभ्या महाराष्ट्राला पडला आहे. भाजपने अशी कोणती जादुची कांडी फिरवली अन् पाउणशे वर्षांची कॉंग्रेसशी असलेली बांधिलकी तोडायला कुणाल पाटील तयार झाले?
यातलं महत्वाचं कारण म्हणजे कुणाल पाटील यांनी स्वत:च राजकीय भवितव्य बघितलं. धुळे जिल्हा हा पूर्णपणे महायुतीमय झाला आहे. धुळ्यातील पाच पैकी चार आमदार भाजपचे आहेत, तर एक आमदार शिवसेनेचा (शिंदे गट) आहे. इतकच काय तर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. स्थानिक पातळीवरही कॉंग्रेस पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. भाजपने सर्व स्तरावर आपला कब्जा करत कॉंग्रेसला हद्दपार केलं आहे. धुळ्यात कॉंग्रेसची कुणाल पाटील यांची एकमेव जागा निवडून येत होती, मात्र विधानसभेला त्यांचाही पराभव झाला. भाजपच्या राम भदाणे यांनी कुणाल पाटील यांचा पराभव केला. त्यामुळे आपलं राजकीय भवितव्य धोक्यात आल्याचं पाहून पाटील यांनी भाजपची वाट धरली असल्याचं सांगितलं जातं.
त्यामुळे पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनाही सत्ताधारी पक्षात जावे वाटले. शिवाय भाजकडून त्यांना अनेकदा पक्षात येण्यासाठी ऑफरही होती. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव कोणताही शब्द, आश्वासन न घेता भाजपात जात असल्याचं ते स्वत:सांगतात. याशिवाय आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व शहरी भागाचा समतोल विकास यातून साधण्याचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.