Kunal Patil BJP : तब्बल 75 वर्षांपासून कॉंग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या धुळ्यातील पाटील घराण्याचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी अखेर आज ता. (1.जुलै) भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांची उपस्थितीत वाजत-गाजत त्यांचा पक्षप्रवेश झाला. यामुळे खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर विरोधी पक्ष खिळखिळे करण्याचे काम भाजपने सुरु केले आहे. त्याचाच भाग म्हणून खान्देशातील बुलंद तोफ असलेल्या कुणाल पाटील यांना गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न सुरु होता. तो अखेर यशस्वी झाला. तीन पिढ्यांपासून कॉंग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या धुळ्यातील पाटील घराण्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे आता भाजपवासी झाले आहेत.
मुंबईत भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे, रविंद्र चव्हाण व गिरीश महाजन यांच्या उपस्थित कुणाल पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत प्रातिनिधिक स्वरुपात काही कार्यकर्त्यांचा यावेळी भाजपमध्ये प्रवेश झाला. उर्वरित कार्यकर्त्यांचा प्रवेश धुळे जिल्ह्यात होणार आहे. यामुळे धुळे जिल्ह्यात भाजपची ताकद आता वाढली आहे.
यावेळी कुणाल पाटील म्हणाले, माझ्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. कॉंग्रेस पक्षात गेली अनेक वर्ष काम केल्यानंतर भारतीय जनता पक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पक्ष प्रवेश करतो आहे. गेल्या तीन पिढ्यांचा वारसा सोडून, ७५ वर्ष ज्या कुटुंबाने कॉंग्रेसची पंरपरा चालवली त्या कुटुंबातील एक सदस्य भाजपात जातो आहे अशा बातम्या चार दिवसांपासून मीडियावर सुरु आहेत. हे अत्यंत खरं आहे. १९६२ मध्ये जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरु यांची मोठी क्रेझ देशात होती. त्यावेळेलाही माझे आजोबा चुडामण आण्णा यांची देशात सर्वात जास्त मतांनी निवडून येणाऱ्या खासदारात नोंद झाली होती. २५ वर्ष त्यांनी सभागृहाला दिली. हा इतिहास उत्तर महाराष्ट्र, आमचा खान्देश विसरु शकत नाही.
त्यानंतर माझे वडिल १९७८ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. २००९ पर्यंत ते आमदार होते. अनेक मंत्रीपदं त्यांनी भूषवली. हा सर्व इतिहास जेव्हा माझ्या डोळ्यासमोरुन जातो तेव्हा माझ्या लक्षात येतं की, जी माझ्या आधीच्या पिढ्यांनी विकासाची पंरपरा मला दिली आहे. ती विकासाची परंपरा सांभाळण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे. सेवा व विकासाची पंरपरा माझ्या आजोबा व वडिलांनी जपली. ती विकासाची परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी भाजपत प्रवेश करत असल्याचे ते म्हणाले.
उत्तर महाराष्ट्र कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र याच उत्तर महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत काही अंशी मागे पडला. आपला जिल्हा व उत्तर महाराष्ट्राचा विकासाचा बॅकलॉग भरुन काढायचा असल्याने आपण भाजपात प्रवेश करत असल्याचं कुणाल पाटील म्हणाले.