Meeting on Lasalgaon water issue News updates Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

छगन भुजबळांच्या मतदारसंघातील लासलगावला १५ दिवसांतून एकदा पाणी!

राजकीय पक्ष, संघटनांचा आज आक्रोश मोर्चा व उपोषण तर सरपंचांचा गावबंदचा इशारा

Sampat Devgire

लासलगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री (Guardian Minister) तथा मतदारसंघाचे पालक छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघातील महत्त्वाचे आणि आशिया खंडातील नावाजलेली कांद्याची बाजारपेठ असलेले लासलगाव (Lasalgaon) सध्या पाण्यासाठी व्याकुळ (Water scarcity) झाले आहे. ग्रामस्थांतर्फे सर्वपक्षीय गाव बंदचा इशारा सरपंच जयदत्त होळकर यांनी दिला आहे. उद्या मोर्चा काढण्यात येणार असून उपोषण कऱण्यात येणार आहे. (Lasalgaon water issue News Updates)

लासलगाव विंचूरसह १६ गाव पाणी योजनेची वाहिनी वारंवार फुटत असल्याने पाणीपुरवठ्यावर विपरित परिणाम होत असतानाही समितीचा कार्यभार पहात असलेल्या निफाड पंचायत समितीचे गट विकास अधिकारींच्या दुर्लक्षामुळे पाणीपुरवठा पूर्णतः विस्कळीत झाला आहे. लासलगावला पंधरा दिवसातून एकदाच पाणीपुरवठा होत आहे यावरून परिस्थितीची कल्पना यावी. नागरिक व महिलांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाल्याने ही योजना तातडीने दुरुस्त करून पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

लासलगाव विंचूरसह १६ गाव पाणीपुरवठा योजना ही नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यावरून कार्यान्वित झालेली आहे. मात्र या योजनेची वाहिनी मोठ्या प्रमाणात जीर्ण झाल्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा गळती होत असल्याने थेट पाणीपुरवठा बंद करण्याची वेळ समितीवर आलेली आहे. या समितीची देखभाल सध्या निफाड पंचायत समितीकडे असून गट विकास अधिकारी या समितीचे अध्यक्ष आहेत. दर आठवड्याला पाणी गळती होत असल्याने थेट पाणीपुरवठा बंद केला जात असतानाही अधिकारी योजनेकडे जातीने लक्ष घालत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. अधिकारी हेतुपुरस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप विविध ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना केला आहे.

सोळा गावांना फटका

श्री. भुजबळ यांच्या प्रयत्नातून या पाणीपुरवठा योजनेस दुरुस्तीसाठी १७ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे, मात्र हे काम होण्यास अजूनही अवधी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मोडकळीस व शेवटच्या घटका मोजणाऱ्या या पाणीयोजनेची देखभाल करून पाणीपुरवठा सुरळीत करणे देखील प्रशासनाचे काम असताना निफाड पंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे समाविष्ट गावातील नागरिकांना वेळेवर पाणी मिळत नसल्याने पाण्यासाठी नागरिकांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे. पाणी योजनेचा बंद पडलेला पुरवठा तातडीने सुरु करावा व वाहिनी दुरुस्तीची काम युद्धपातळीवर करावे अन्यथा लासलगाव ग्रामस्थांच्यावतीने सर्वपक्षीय गाव बंद करण्यात येणार असल्याची माहिती लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी दिली आहे.

या गंभीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी गट विकास अधिकारी यांच्या दालनात सोळा गाव समितीच्या लाभार्थी गावाची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर, कोटमगावचे तुकाराम गांगुर्डे, विंचूरचे सचिन दरेकर, विस्तार अधिकारी एस. के. सोनवणे, निफाड पंचायतीचे माजी सभापती शिवा सुरासे, गुणवंत होळकर यांच्यासह ग्रामसेवक शरद पाटील, जी. टी. खैरनार, शशिकांत कदम, योगेश बत्तीसे, डी. बी साळुंके, शेषराव धिवर उपस्थित होते.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT