MLA Suresh Bhole
MLA Suresh Bhole Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप उमेदवारांचे अर्ज बदलले

सरकारनामा ब्यूरो

जळगाव : महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्तेच्या बळावर अधिकाऱ्यांना हाताशी धरून जळगाव जिल्हा बँकेतील भाजप उमेदवारांचे अर्ज बदलविले, असा थेट आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे यांनी शनिवारी (ता. २३ ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत केला. (Leaders of mahaAgadi changed applications of BJP candidates : MLA Suresh Bhole)

भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खासदार उन्मेष पाटील, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक विशाल त्रिपाठी उपस्थित होते. आमदार भोळे म्हणाले की, भाजप उमेदवारांना अर्ज भरण्याची सर्व माहिती आहे, त्यामुळे त्यांनी व्यवस्थित उमेदवारी अर्ज भरले आहेत. खासदार रक्षा खडसे ह्या तर दोन वेळा खासदार झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांच्या उमेदवारी अर्जात त्रुटी राहणे शक्य नाही.

शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. त्यांनी सत्तेच्या बळावर अधिकाऱ्यांना हाताशी धरून भाजप उमेदवारांचे थेट अर्ज बदलले आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आपण निवडून येणार नाही, याची भीती असल्यामुळेच त्यांनी हा प्रकार केला आहे. शेतकऱ्यांची बँक भांडवलदारांच्या हातात देण्याचे पाप या महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना करावयचे असून जनता त्यांना निश्‍चित धडा शिकवेल, असेही आमदार सुरेश भोळे म्हणाले.

अर्ज जाणीवपूर्वक बाद केले

खासदार उन्मेष पाटील म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज जाणीवपूर्वक बाद करण्यात आले. महाविकास आघाडीच्या नेत्यांना लोकशाही मार्गाने ही निवडणूक लढवायची नाही. त्यामुळेच ते असा प्रकार करीत आहेत. जर त्यांना विजयाची खात्री आहे, तर निवडणूक लढवायला हवी होती. त्यांनी असा प्रकार करून बिनविरोध झाल्याचा आव आणणे चुकीचे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT