Shiv Sena UBT : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्याच्या आत घेण्याचे निर्देश सुप्रिम कोर्टाने दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आता मैदानात उतरला आहे. महाराष्ट्रात आगामी काळात होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी ठाकरे गटाकडून नेत्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
यात शिवसेना उबाठाचे फायर ब्रॅण्ड नेता असलेल्या संजय राऊत यांच्यावर काही प्रमुख शहर व जिल्ह्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेता व प्रदीर्घ काळापासून नाशिकची जबाबदारी सांभाळत आलेल्या संजय राऊत यांच्या हाती उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा नाशिकची धुरा सोपविली आहे. नाशिकसह जळगाव, मालेगाव, धुळे, अहिल्यानगर या उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख शहर व जिल्ह्यांची जबाबदारी उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या खांद्यावर सोपविली आहे. याशिवाय पुणे व पिंपरचिंचवड ची जबाबदारी देखील राऊत यांच्याकडेच असणार आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात आजूनही शिवसेना ठाकरे गटाचे संघटन बऱ्यापैकी टिकून आहे. त्यामुळे नाशिक मनपा व जिल्हा परिषद निवडणूक हे ठाकरे गटाचे प्रमुख लक्ष असणार आहे. गेल्या काही वर्षात नाशिक शिवसेना व संजय राऊत हे समीकरण झाले आहे.
यापूर्वी नाशिकचा कारभार हा संपर्कप्रमुखाच्या नेतृत्वाखाली चालत होता. मात्र काही वर्षापूर्वी प्रथमच उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख नेतेपद तयार करुन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपर्कप्रमुख नेमले गेले. आजवर राऊत यांनी नाशिकची सूत्रे आपल्या हाती ठेवत पक्षाची बांधणी येथे केली आहे. राऊतांनी पक्षातील गटबाजी कमी करण्यासाठी व डॅमेजकंट्रोलसाठी प्रयत्न करत जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न केला आहे.
नाशिकनंतर जळगाव महागरपालिका व जिल्हापरिषदेची निवडणुक ठाकरे गटासाठी महत्वाची मानली जात आहे. जळगाव जिल्हा हा नेहमीच शिवसेनेच्या प्रभावाखाली राहिला आहे. मात्र यंदा शिवसेनेच्या फुटीनंतर शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांचा एक गट व दुसरा एकनाथ शिंदे यांचा गट तयार झाल्याने चित्र बदलणार आहे. स्थानिक पातळीवरील दोन्ही पक्षांची ताकद विभागली गेली असली तरी आजूनही ठाकरे गटाचा बऱ्यापैकी प्रभाव जळगाव जिल्ह्यात आहेत, त्यामुळे संजय राऊत यांच्याकडे या जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
याउलट अहिल्यानगरमध्ये मात्र विधानसभा निवडणुकीच्या वेळेला संजय राऊत यांच्यावर नाराजी निर्माण झाली होती, त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी पुन्हा त्याच खासदार संजय राऊत यांच्यावर सोपविल्याने शहरातील काही जुने कार्यकर्ते अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटात जागावाटपावरुन असंतोष निर्माण झाला होता. त्यातून पक्षाला मोठी गळती सुरु झाली ती अद्याप थांबलेली नाही. त्यातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्ह्यातील निवडणुकीची जबाबदारी पुन्हा राऊतांकडे दिल्याने शिवसैनिकांत अवस्थता असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.