
Pune, 19 May : इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनखालील साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली श्री जय भवानी माता सर्वपक्षीय पॅनेलचे सर्वच सर्व २१ उमेदवार तब्बल पाच ते सहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे छत्रपती कारखान्यावर अजित पवार समर्थकांची सत्ता येणार, हे निश्चित मानले जात आहे.
लासुर्णे गटातून सहा हजार मते पृथ्वीराज जाचक (Prithviraj Jachak) यांना मते मिळत आहेत, तर विरोधात तीन हजार मते जात आहेत. त्यामुळे पॅनेल टू पॅनेल असे मतदान झाले आहेत. मतमोजणीच्या फेऱ्या रात्री उशिरापर्यंत चालणार आहेत. साधारपणे पाच ते सहाच्या सुमारास मतमोजणीची पहिली फेरी पूर्ण होईल. रात्री दहापर्यंत अंतिम निकाल येण्याची शक्यता आहे, असे अजित पवारांचे निकटवर्तीय किरण गुजर यांनी सांगितले.
ते म्हणाले, छत्रपती कारखान्याचा निकाल हा एकतर्फीच लागण्याची शक्यता आहे. कारण इंदापूर (Indapur) तालुक्यातील तीन गटांतील मतदान आतापर्यंत मोजून झाले आहे. उर्वरीत तीन गट हे इंदापूर तालुक्यातील अंथुर्णे आणि बारामती तालुक्यातील दोन गट आहेत. अंथुर्णेचा गट आता वन वे सुरू आहे. बारामती तालुका हा ८० आणि २० असा चालणार आहे.
दत्तात्रेय भरणे यांचा एरिया आणि अजितदादांचा एरिया अजून मतमोजणीचा आहे, त्यामुळे बारामती आणि इंदापूरमध्ये ८० : २० असेच मतदान होणार आहे. सभासदांनी पॅनेल टू पॅनेल मतदान केले आहे. त्यांनी अजितदादा, भरणे आणि पृथ्वीराज जाचक यांच्यावर विश्वास टाकल्याचे दिसून येत आहे, असे किरण गुजर यांनी स्पष्ट केले.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी (ता. १८ मे) ७४ टक्के मतदान झाले होते. छत्रपती कारखान्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनेत्रा पवार, क्रीडा व युवक कल्याणमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, जिल्हा बॅंकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
साखर कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता तो बिनविरोध करावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न केले होते. त्यासाठी अजितदादांनी गेली अनेक वर्षे कट्टर विरोधक असलेले पृथ्वीराज जाचक यांचे नेतृत्व जाहीर करून सर्वपक्षीय पॅनेल जाहीर करण्यात आले होते. सर्वपक्षीयांना सोबत घेऊन छत्रपती कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न अजित पवार यांनी केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.
पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली श्री जय भवानी माता सर्वपक्षीय पॅनेल उभे करण्यात आले होते. त्याला इंदापूरचे माजी आमदार राजेंद्रकुमार घोलप यांचे नातू आणि इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप, या भागातील ज्येष्ठ नेते मुरलीधर निंबाळकर यांचे पुतणे संग्रामसिंह निंबाळकर असे काही मातब्बर उमेदवार विरोधी छत्रपती बचाव पॅनेलमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे आता कोणाला किती जागा मिळतात, हे पाहावे लागणार आहे.
अजित पवार आणि पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील श्री भवानी माता पॅनेलच्या सर्वच सर्व उमेदवारांना पहिल्या टप्प्यात मिळालेली मतांची आघाडी पाहता, त्यांची सत्ता येणार हे निश्चित आहे. मात्र, विरोधातील पॅनेल किती मते घेणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.