Nashik Loksabha Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Loksabha : लोकसभा इच्छुकांचे मराठा आरक्षण अन्‌ अध्यक्षांच्या निर्णयाकडे डोळे

सरकारनामा ब्यूरो

अरविंद जाधव

Nashik News : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांसमोर सुरू असलेली सुनावणी आणि मराठा आरक्षण मुद्यावर राज्य सरकारकडून येणारा प्रतिसाद लक्षात घेऊनच आपली पुढील भूमिका स्पष्ट करायची, अशी रणनीती कुंपनावर बसलेल्या सर्वपक्षीय नेत्यांकडून आखली जात आहे. (Lok Sabha aspirants focus on Maratha reservation and Assembly speaker's decision)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे आज (ता. 08 जानेवारी) शहरात आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष उद्या (ता. 09जानेवारी) चंद्रशेखर बावनकुळे यांचाही दौरा आहे. लोकसभेसाठी इच्छूक असलेल्या नेत्यांच्या गाठीभेटीसुद्धा होतात. मात्र, महिनाअखेरपर्यंत पक्षाचे अस्तित्व आणि मराठा आंदोलनाचा कल लक्षात घेऊनच नाशिकचे नेते पूर्ण ताकदीनीशी लोकसभेच्या मैदानात उतरतील, अशी चिन्हे आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा लोकसभेत महत्वाचा ठरणार आहे. मंत्री छगन भुजबळ हेही ओबीसींना संघटीत करण्यासाठी सरसावले आहेत. या वादाचा थेट परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर होणार आहे. याची जाणीव इच्छूक उमेदवारांना आहे. त्यामुळे सर्वप्रथम विधानसभा अध्यक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबत काय निर्णय देतात, हे पाहणे महत्वाचे आहे. लोकसभा निवडणुकीत पक्ष आणि चिन्हांचा फायदा होतो.

आजमितीस नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघात इच्छूक उमेदवारांकडून अप्रत्यक्ष प्रचार आणि प्रसार सुरू आहे. आगामी काळात आपल्याच पक्षाकडून तिकीट मिळेल की नाही, याचीही शाश्वती नाही. तसेच, जागा वाटपाचा फॉर्म्युला काय ठरतो, हेसुद्धा इच्छुकांसाठी महत्त्वाचे आहे. मात्र, पक्षाच्या नेत्यांकडून सर्वच इच्छूकांना लोकसभेची तयारी करण्यास सांगण्यात येत आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपचे दिनकर पाटील आणि राहुल ढिकले यांच्याकडून मतदारांच्या गाठीभेटी सुरू आहेत. शरद पवार गटाकडून गोकुळ पिंगळे, अजित पवार गटाकडून शिवाजी सहाणे यांची नावे पुढे येत आहेत. शिवसेनेचे विजय करंजकर यांच्या पाठीशी शिवसैनिक ठामपणे उभे आहेत. नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे हेसुद्धा लोकसभेसाठी इच्छूक आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा निवडणुकीत सक्रीय होण्याची चिन्हे आहेत. इच्छूक उमेदवारांची यादी मोठी आहे आणि होतच जाईल. मात्र, या संभाव्य उमेदवारांचे सर्व लक्ष विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे तसेच मराठा आंदोलनाच्या घडामोडींकडे आहे. या आंदोलनाचा मोठा परिणाम निवडणुकीत होणार आहे. ज्या बाजूने आंदोलन फिरेल, त्या बाजूने मराठा समाजाचे मतदार वळण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे उमेदवारसुद्धा हातचे राखून घडामोडींकडे पाहत आहे. ता. २० ते २६ जानेवारी या कालावधीत मराठा आंदोलनात अनेक घडामोडी घडतील. त्यानंतरच सर्वपक्षीय नेते राजकीय आखाड्याच्या मैदानात पूर्ण ताकदीनीशी उतरतील, अशी चिन्हे आहेत.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT