Ajit Pawar| Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Ahmednagar News : नगर राष्ट्रवादीत 'ऑल इज नॉट वेल', लंके सोडून जाण्याच्या तयारीत असतानाच...

Pradeep Pendhare

Ahmednagar Political News : नगर लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) रणसंग्राम सुरू झाला आहे. महायुतीत आणि महाविकास आघाडीत उमेदवार वाटपाचा घोळ सुरू असल्याचे दिसते. कोणता पक्ष कोठे, उमेदवारी कोणाला याचीदेखील निश्चिती नाही. यातच राज्यातील फुटलेल्या पक्षांमध्ये संघटना बांधणीचे आव्हान आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष संघटना वाढवण्यासाठी धडपडत आहे. राजकारणात दुसऱ्याला घाम फोडणाऱ्या अजितदादांना (Ajit Pawar) नगर दक्षिणमधून राजकीय धक्के बसताना दिसत आहेत.

आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) साथ सोडून जाण्याच्या तयारीत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अवघ्या चार महिन्यांतच नगर जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांना नगर दक्षिणच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले. यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेत लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत 'ऑल इज नॉट वेल', असे काहीसे चित्र पाहायला मिळते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षावर दावा केला. केंद्रीय निवडणूक आयोगाने अजित पवार यांना पक्षचिन्ह आणि नाव वापरण्यास परवानगी दिली. या निर्णयाला शरद पवारांकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी अजित पवार गटाला चिन्ह वापरण्यावरून 'अटी व शर्ती' लागू केल्या.

त्यामुळे पक्ष आणि पक्ष चिन्हाबाबत अजित पवार यांना कायदेशीर लढाईत धक्का बसला असतानाच आता संघटना बांधणीबाबतदेखील आव्हाने येऊ लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार यांनी राज्यात पक्ष संघटन वाढीवर भर दिला.

कार्यशाळा, शिबिरांबरोबर अधिवेशन घेतले. संघटन वाढ किती महत्त्वाची आहे, हे त्यांच्याबरोबर आलेल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितले. यात अजित पवारांबरोबर आलेल्यांना काहींना प्रमुख पदांवर संधी मिळाली. परंतु, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काहीतरी बिनसल्याचे समोर येऊ लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नगर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी प्रशांत गायकवाड यांची चार महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना आता अजितदादांनी हटवले. प्रशांत गायकवाड (Prashant Gaikwad) यांना हटवून त्यांच्या जागेवर राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा (Balasaheb Nahata) यांची वर्णी लागली.

नगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड यांच्याविषयी अजितदादांकडे एकत्रित तक्रारी गेल्या होत्या. पक्ष संघटनेसाठी वेळ न देणे, सतत मुंबईत मंत्रालयात असणे, नेत्यांमध्ये चुगल्या लावणे, अशा तक्रारी होत्या. गेल्या आठवड्यात पक्षाची नगरमध्ये बैठक झाली. या बैठकीत प्रशांत गायकवाड यांना हटवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात आली.

पक्षाचे समन्वयक आमदार संग्राम जगताप, नगर उत्तर जिल्हाध्यक्ष कपिल पवार, अविनाश आदिक, दत्ता पानसरे, अक्षय भालेराव, माजी आमदार चंद्रशेखर घुले, राजेंद्र गुंड यांनी अजितदादांची भेट घेतली. बाळासाहेब नाहटा यांना नगर दक्षिण जिल्हाध्यक्षपदी संधी देण्यात आली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), मंत्री हसन मुश्रीफ, नेते रामराजे निंबाळकर, खासदार प्रफुल्ल पटेल आदी उपस्थित होते.

माजी आमदार घुले अजितदादांबरोबर...

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अजितदादांची साथ करणारे श्रीगोंद्यातील राजेंद्र नागवडे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी, राजेंद्र गुंड यांची प्रदेश सरचिटणीसपदी, संजय कोळगे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी वर्णी लागली. माजी आमदार चंद्रशेखर घुले हे पक्ष फुटल्यानंतर कोणत्याच गटाच्या संपर्कात नव्हते.

परंतु, मंगळवारी त्यांनी अजितदादांकडे हजेरी लावली. त्यांचे समर्थक संजय कोळगे यांची त्यांनी संघटनेतील पदावर वर्णी लावून घेतली. श्रीगोंद्यातील बाळासाहेब नाहाटा यांच्याकडे जिल्हाध्यक्ष, तर अनुराधा नागवडे यांच्याकडे महिला आघाडीचे जिल्हाध्यक्षपद आहे. नगर जिल्ह्यातील एकाच तालुक्यात दोन्ही जिल्हाध्यक्षपद दिली गेली आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT