Chhagan Bhujbal hemant godse sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : भुजबळांच्या 'त्या' विधानाने गोडसे समर्थक अस्वस्थ?

Sampat Devgire

Nashik News : नाशिक लोकसभा मतदारसंघात ( Nashik Lok Sabha Constituency ) विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांनी आपल्याला उमेदवारी मिळेल, असा दावा केला आहे. अशातच दुसरे इच्छुक राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनीही एक विधान करून गोडसे यांच्या विधानाला सूचक उत्तर दिले आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघाचा तिढा आज तरी सुटेल का? याची चर्चा आहे.

नाशिक मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाने नैसर्गिक न्यायाने दावा केला आहे. त्याला भारतीय जनता पक्षाची अप्रत्यक्ष मदत घेत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही आव्हान दिले आहे. त्यामुळे नाशिक मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार असेल हा वाद गेले दोन आठवडे रोज नवे वळण घेत आहे. मंगळवारी खासदार गोडसे ( Hemant Godse ) यांनी मुख्यमंत्र्यांनी आपल्याला नाशिकची जागा शिंदे गटाला असेल व गोडसे हे उमेदवार असतील, असे सांगितल्याचा दावा केला होता. या बातमीचा आनंद गोडसे समर्थकांना फार काळ घेता आला नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंगळवारी ( 23 एप्रिल ) सकाळी भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांच्या निवासस्थानी अखिल भारतीय समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत समता परिषदेकडून ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी मंत्री भुजबळ यांनी उमेदवारी करावी, असा आग्रह करण्यात आला. बैठकीनंतर भुजबळ यांनी मात्र आपण उमेदवारी करणार नाही, असे स्पष्ट केले. पण, गेल्या काही वर्षांतील भुजबळ यांचे राजकारण विचारात घेता, या सर्व घडामोडी अतिशय बोलक्या आहेत. भुजबळ यांना कोणताही निर्णय घ्यावयाचा असल्यास, त्याआधी अशा बैठका होतात. संबंधित भागातील त्यांचे समर्थक तशी मागणी करतात. ही प्रथा आहे. त्यामुळे मंगळवारी झालेल्या समता परिषदेच्या बैठकीचा सूर हा भुजबळ विरोधकांना सावध करणारा आहे.

बैठकीनंतर बोलताना गोडसे यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री शिंदे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, "गोडसे यांनी उमेदवारी मिळाल्याची गोड बातमी आम्हाला द्यावी" असे सूचक विधान केले. या विधानाचे अनेक अर्थ निघतात. गोडसे समर्थकांना सावध होण्याचा अराजकीय सल्लादेखील असू शकतो. दुसरीकडे भुजबळ यांनी आपल्या उमेदवारीचे प्रयत्न अद्याप सोडलेले नाही, असे संकेत यातून मिळतात.

राज्यातील ठाणे, नाशिक आणि मुंबईतील दोन मतदारसंघांबाबत महायुतीमध्ये ओढाताण सुरू आहे. विशेषत: शिवसेनेचा प्रभाव असलेल्या आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या ठाणे मतदारसंघावरून हा तिढा अधिकच बिकट झाला आहे. त्यामुळे ठाणे आणि नाशिक यामध्ये भारतीय जनता पक्ष व शिंदे गट याच्यात तडजोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास मुख्यमंत्र्यांना ठाणे मतदारसंघ अधिक महत्त्वाचा असेल. त्यातून नाशिक भाजपला अर्थात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला गेल्यास भुजबळ हे पहिल्या पसंतीचे उमेदवार असू शकतात. हे चित्र अद्याप बदललेले नाही. त्यामुळे गोडसे यांच्या उमेदवारीचा निर्णय आज तरी होईल का? याची उत्सुकता टिकून आहे.


( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT