Owaisi, Jalil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MIM in Ahmednagar : लोकसभेच्या रिंगणात MIM ची एन्ट्री? कुणाची डोकेदुखी वाढणार?

Lok Sabha Election : नगर जिल्ह्यात MIM ची चाचपणी

Pradeep Pendhare

Ahmednagar Politcal News :

लोकसभा निवडणुकीसाठी ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच MIM ने महाराष्ट्रात तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर MIM ने नगर जिल्ह्यात चाचपणी सुरू केली असली तरी MIM राज्यात किती जागा लढवणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

MIM ने (AIMIM) राज्य संघटनेकडून चाचपणी सुरू केली आहे. या चाचपणीत काय निष्कर्ष निघतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत गेल्या वर्षी हिंदूत्वाचे प्रयोग झाल्याचे सांगण्यात येते. गेल्या वर्षी काही जिल्ह्यांत जातीय दंगली झाल्या, तसेच तणावही निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर MIM ने निवडणूक लढवण्याची चाचपणी सुरू केली आहे.

गेल्या वर्षी नगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, अमरावती, जळगाव, नाशिक, बीड जिल्ह्यांमध्ये कुठे ना कुठे आणि कोणत्या ना कोणत्या कारणातून जातीय दंगली झाल्या. यातून समाज होरपळला गेला. या जातीय दंगलीनंतर हिंदू समाज मैदानात उतरला होता. यावर राज्यातील दिग्गज नेत्यांनी चिंता व्यक्त केली होती. हे हिंदूत्वाचे प्रयोग असल्याचे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे.

महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट, त्यानंतर झालेली जातीय दंगल या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुका होणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि देशात 'इंडिया' आघाडी विरुद्ध भाजपप्रणीत एनडीए लोकसभेला सामोरे जाणार आहेत. यात महाराष्ट्रात MIM नेही उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यादृष्टीने MIM महाराष्ट्रात लोकसभेसाठी स्वतंत्र चाचपणी करीत असल्याचे दिसते आहे. या पक्षाची महाराष्ट्रात ताकद जरी कमी असली, तरी गेल्या वर्षीच्या दंगलीत ज्या अल्पसंख्याक, मागासवर्गीय, दलित घटक, बहुजनांना झळ बसली, तो समाज 'एमआयएम'च्या अजेंड्याखाली येऊ शकतो, असे राजकीय गणित आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'एमआयएम' आणि वंचित बहुजन आघाडीने 2018 मध्ये युती केली होती. महाराष्ट्रात 2019 मध्ये लोकसभा निवडणूक या युतीने लढवली. यात इम्तियाज जलील औरंगाबाद मध्य लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते.

हैदराबादच्या बाहेर पहिल्यांदाच MIM ने लोकसभेची जागा जिंकली. खासदार इम्तियाज जलील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. राज्यभरात त्यांनी पक्षाच्या संघटनेचे जाळे विणले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम त्यांनी केले आहे. या लोकसभा निवडणुकीतदेखील MIM निवडणुकीच्या तयारी आहे.

या लोकसभा निवडणुकीत राज्यात किती जागा लढवणार, यावर चाचपणी MIM करीत आहे. यासाठी राज्यतील पक्ष संघटनेतील प्रमुख पदाधिकारीदेखील उत्सुक आहेत. पक्ष संघटनेने जिथे काम तिथे चाचपणी केली जात आहे.

MIM चे नगर जिल्हाध्यक्ष डॉ. परवेझ अशरफी म्हणाले, 'महाराष्ट्रात गेल्या वर्षी अनेक भागांमध्ये जातीय दंगली झाल्या. यात नगर जिल्ह्यात जास्तच दंगली झाल्या. यात अल्पसंख्याक समाज टार्गेट झाला. नगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात झालेल्या जातीय दंगलींमध्ये पक्षाने अल्पसंख्याक समाजाबरोबर बहुजनांची बाजू चांगल्या पद्धतीने लावून धरली. त्यामुळे पक्षाचे काम दिसते. यात पक्षाच्या कामाचे आणि संयमाचे बहुजनांकडूनदेखील कौतुक होत आहे.'

'पक्ष संघटनेच्या या कामामुळे युवावर्गदेखील संघटनेबरोबर आहे. सकारात्मक परिस्थिती असल्याने नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांविषयी अहवाल प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांच्याकडे सादर करणार आहे. यानंतर प्रदेशपातळीवर निर्णय झाल्यानंतर काम केले जाईल,' असे डॉ. अशरफी यांनी सांगितले.

MIM ची ताकद

MIM चा महाराष्ट्रात एक खासदार आहे. याशिवाय विधानसभा, महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, ग्रामपंचायतींमध्ये चांगला स्कोअर आहे. विधानसभा 2019 मध्ये 'एमआयएम'चे मालेगाव (मध्य) आणि धुळे (शहर) मतदारसंघात विजय मिळवला.

विधानसभा 2019 मध्ये 'एमआयएम'ला 7 लाख 37 हजार 888 (1.34 टक्के) मते मिळाली होती. महापालिकेत छत्रपती संभाजीनगर 25, अमरावती दहा, सोलापूर नऊ, मालेगाव सात, धुळे चार, मुंबई दोन, ठाणे दोन, कल्याण दोन आणि पुणे एक जागा जिंकली आहे.

महाराष्ट्रातील महापालिकेत एकूण 62 नगरसेवक, नगरपालिका आणि नगर परिषदेत 40 सदस्य, ग्रामपंचायतींमध्ये 102 सदस्य आणि एक जिल्हा परिषद सदस्य आहे. दोन वर्षांपासून स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे आता हा पक्ष राज्याच्या निवडणुकांमध्ये किती यशस्वी ठरतो, हे लवकरच स्पष्ट होईल.

तेलंगणाने आत्मविश्वास वाढवला

तेलंगणा विधानसभा निवडणुकीत MIM ने मोठे यश मिळवले आहे. नऊपैकी सात जागांवर विजय प्राप्त करून MIM ने राष्ट्रीय पक्षांना जाणीव करून दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत MIM हा राष्ट्रीय पातळीवर किती जागा लढवणार, याची उत्सुकता आहे.

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आता लोकसभा निवडणुका होत आहेत. यात MIM किती ताकदीने उतरतो, याकडे लक्ष लागले आहे. तेलंगणा निवडणुकीत मिळवलेल्या यशामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. यातूनच महाराष्ट्रात लोकसभेची चाचणी होत आहे.

(Edited by Avinash Chandane)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT