Rahul Gandhi, Kunal Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : राहुल गांधींचा शब्द पाळणार; कुणाल पाटील भाजपला घाम फोडणार!

Malegaon-Dhule Constituency will be contested by Congress : मालेगाव धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेस लढवणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. पारंपरिक मतदार असलेल्या मतदारसंघात मुस्लिम बहुल तसेच मराठा समाजाच्या मतदारांचे वर्चस्व आहे.

Arvind Jadhav

Dhule News : मालेगाव धुळे लोकसभा मतदारसंघ काँग्रेस लढवणार हे जवळपास स्पष्ट आहे. काँग्रेसकडून लढण्यास अनेक नावे पुढे येत असली तरी राहुल गांधीच काँग्रेसचा उमेदवार जाहीर करतील आणि काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडेल, असे चित्र सध्या निर्माण झाले आहे.

काँग्रेस (Congress) चा पारंपरिक मतदार असलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघात मुस्लिम बहुल तसेच मराठा समाजाच्या मतदारांचे वर्चस्व आहे. आमदार कुणाल पाटील यांनी यापूर्वी लढवलेली निवडणूक आणि काँग्रेस पक्षाची तळागाळापर्यंत पोहाेचलेली यंत्रणा याचा चांगला परिणाम या वेळी दिसून येऊ शकतो, असा दावा काँग्रेसजनांकडून करण्यात येतो. मालेगाव धुळे लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या काँग्रेस उमेदवारांमध्ये कुणाल पाटील (Kunal Patil) यांच्या नावास वरिष्ठ पातळीवर पसंती असल्याचा दावा करण्यात येतो आहे.

धुळे लोकसभा (Dhule Loksabha) मतदारसंघात मालेगाव बाह्य, मालेगाव मध्य, देवळा या नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो, तर धुळे जिल्ह्यातील धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. 1996 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर आतापर्यंत एक अपवाद वगळता लोकसभेच्या जागेवर भाजपने वर्चस्व कायम ठेवले. भाजप (BJP) च्या सुभाष भामरे यांना या वेळी तिकीट मिळणार की नाही, याविषयी तर्कवितर्क लढवले जात असताना भाजपकडे इच्छुकांची मोठी फौज उभी आहे.

एमआयएम (MIM) ने काँग्रेसच्या मतदारांकडे आपल्याकडे वळविल्याचा फटका गत निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांना बसला होता. माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या पश्चात कुणाल पाटील यांनी काँग्रेसच्या डुबत्या जहाजाला आजवर चांगला टेकू दिला असून, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पुन्हा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा पुढील आठवड्यात मतदारसंघात पोहाेचणार असून, त्यावेळी पाटील यांचे नाव जाहीर होऊ शकते.

धुळे लोकसभा मतदारसंघात पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, धुळे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर हेसुद्धा काँग्रेसकडून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, संस्थात्मक पातळीवर आमदार कुणाल पाटील यांचे वर्चस्व मोठे असून, मोदी लाटेतसुद्धा कुणाल पाटील यांनी भाजपचा झंझावात आपल्या धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पोहाेचू दिला नाही.

दोन्ही निवडणुकीत पाटील यांनी बाजी मारली. पाटील यांनी भाजपसमवेत जावे यासाठी अनेकदा प्रयत्न झालेत. मात्र, पाटील अद्याप काँग्रेसबरोबर एकनिष्ठ राहिले आहेत. त्यांच्या या कामाची पावती म्हणून राहुल गांधी हेच त्यांची उमेदवारी न्याय यात्रेदरम्यान जाहीर करतील, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.

(Edited by Amol Sutar)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT