Marathi News : डीजे, ढोल-ताशांच्या जथ्थांकडे वाढता कल... कृत्रिम आवाजातील 'तुतारी'च्या आवाजाला वाढलेली पसंती... या बदलत्या काळात पारंपरिक वाद्य असलेली 'तुतारी' काहीशी अडगळीत पडली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला मान्यता मिळाली. आता या पक्षाचे चिन्ह, 'तुतारी वाजवणारा माणूस', असे आहे. शरद पवार हे त्यांच्या बळावर पक्षाला चांगले दिवस आणतीलच, पण या चिन्हामुळे तुतारीवादकांना मात्र अच्छे दिने आले आहेत.
महाराष्ट्रातील पारंपरिक वाद्यांमध्ये 'तुतारी'ला खूप महत्त्व आहे. शुभ कार्यामध्ये 'तुतारी' वाद्याचा समावेश असायचाच. राजकीय कार्यक्रमांमध्ये पारंपरिक वाद्यासह 'तुतारी' वाजवायचीच. काळ बदलला तसे हे 'तुतारी' वाद्य काहीसे मागे पडले. वादकांकडूनदेखील 'तुतारी' अडगळीत ठेवली गेली. मोजक्याच कार्यक्रमांना 'तुतारी' वादक दिसू लागले. पुढे ढोल-ताशे, ढोली बाजा, बँजाे पार्टी, साउड सिस्टिम आले. (Loksabha Election 2024 News)
पारंपरिक वाद्यांच्या जागी साउंड सिस्टिम वाजू लागली. साउंड सिस्टिम जाऊन त्यांची जागा डीजेने घेतली. डीजेवर रेकॉर्डिंग केलेल्या कृत्रिम आवाजात 'तुतारी' वाजू लागली. तुतारीवादक हा मावळ्याच्या वेशात असायचा. तो लक्षवेधक पद्धतीने 'तुतारी'त हवा फुंकून ती वाजवायचा. परंतु त्याची जागा रेकाॅर्डिंग केलेल्या 'तुतारी'च्या आवाजाने घेतली. शुभ कार्यातदेखील रेकाॅर्डिंग केलेल्या 'तुतारी'चा आवाज घुमू लागला. त्यामुळे तुतारीवादकांचे महत्त्व कमी झाले. पिढीजात असलेले पारंपरिक वाद्य अडगळीत ठेवून वादकांनी पर्यायी व्यवसाय स्वीकारला. काही जण आजही 'तुतारी' वाद्य वाजवतात. परंतु सुपारी कमी मिळत असल्याने ते त्यांना परवडत नाही. मात्र, 'तुतारी'वादकांना आता अच्छे दिन आले आहेत.
राष्ट्रवादी काॅंग्रेस (Ncp) फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय दिला. शरद पवार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, असे नाव मागितले. त्यावर शिक्कामोर्तबदेखील झाला. आता या पक्षाचे'तुतारी वाजवणारा माणूस', असे चिन्हं आहे. दोन्ही पवार गटांचा वाद सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे.
शरद पवार यांनी पक्षाचे नाव आणि चिन्ह घेऊन लोकसभेची तयारी केली आहे. शरद पवारांनी पक्षाला 'तुतारी वाजवणारा माणूस', असे चिन्ह घेताच, त्यांच्या गटात असलेल्या नेत्यांनी 'तुतारी' उद्घाटनाचा धडाका लावला आहे. शरद पवार गटाचे छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना 'तुतारी' वाजवली जात आहे. एक सोडून दोन किंवा वेळप्रसंगी चार व्यक्तींना 'तुतारी' वाजवण्याची सुपारी मिळत आहे. यामुळे तुतारीवादकांना अच्छे दिन आले आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शरद पवार (Sharad Pawar) यांनी 'तुतारी' हे चिन्ह घेताच तुतारीवादकांना अच्छे दिन आले आहेत. वादकांच्या सुपारी वाढल्या आहेत. तसेच सुपारीचा भावदेखील वाढला आहे. वर्षातून पाच किंवा सात कार्यक्रमांची सुपारी मिळायची. आता पंधरा दिवसांत आठ कार्यक्रम होऊ लागले आहेत. निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर सुपारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार तुतारीवादकांनी नियोजन सुरू केले आहे.
(Edited By : Sachin Waghmare)
R