Pune News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये असलेले आमदार नीलेश लंके यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये प्रवेश होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी चार वाजता शरद पवार यांची प्रेस कॉन्फरन्स पुण्यातील पक्ष कार्यालयात होणार आहे. तसेच या वेळीच नीलेश लंके यांचे पुस्तक प्रकाशन कार्यक्रमदेखील राष्ट्रवादीच्या कार्यालयात होणार आहे. त्यामुळे नीलेश लंके यांचा आज पक्ष प्रवेश जवळपास निश्चित मानला जात आहे. त्यासोबतच मनसेचा राजीनामा दिलेले वसंत मोरेदेखील शरद पवार यांची भेट घेणार आहेत. त्यांचाही पक्ष प्रवेश आजच होणार अशादेखील चर्चांना उधाण आले आहे.
पारनेरमधील नीलेश लंके प्रतिष्ठानने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवपुत्र संभाजी महाराज या महानाट्याचा प्रयोग नगरमध्ये घेतला. या महानाट्यातील अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ते सादर केले. या महानाट्याला नगरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महानाट्याच्या समारोपादिवशी खासदार कोल्हे यांनी दिल्लीत महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची 'तुतारी' नगरमधून लोकनेत्यांनी वाजवावी, असे विधान करत आमदार नीलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात येण्याचे निमंत्रण दिले.
हे निमंत्रण मिळाल्यानंतरच्या काळामध्ये नीलेश लंके यांनीदेखील मनावरती घेतल्याचे पाहायला मिळाले. यानंतर नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर लगेचच नीलेश लंके यांचा पक्ष प्रवेश होईल, असे बोलले जात होते. मात्र, तेव्हा तो पक्ष प्रवेश झाला नाही. तो प्रवेश आज होणार असल्याचा बोलले जात आहे.
नीलेश लंके यांच्या एका पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर होणार आहे. याच दरम्यान शरद पवारदेखील या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर जय्यत तयारी सुरू असून, स्टेज उभारण्यात आला आहे. कोविड काळामध्ये लंके यांनी मोठे काम उभारले होते. या कामाचे मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याच दरम्यान नीलेश लंके यांचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे.
यासाठी नगरमधून मोठ्या प्रमाणात गाड्यांचा ताफा पुण्याच्या दिशेने निघाला आहे. नीलेश लंके हे नगर दक्षिणमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. महायुतीमध्ये ही जागा भाजपला गेली असून, सुजय विखे यांना उमेदवारी निश्चित केली आहे. यामुळे महाविकास आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार म्हणून नीलेश लंके हे असू शकतात असे बोलले जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दुसरीकडे काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. यानंतर वसंत मोरे यांनी मनसेला राम राम ठोकला आहे. वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर विविध पक्षाच्या ऑफर त्यांना आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षांकडून खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर मोरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश करतील असं बोलले जात आहे.
मोरेसाठी सर्वाधिक सोयीस्कर पक्ष हादेखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षच मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी चार वाजता राष्ट्रवादीच्या पक्ष (Ncp) कार्यालयात वसंत मोरे हे शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेणार आहेत. याच दरम्यान नीलेश लंके (nilesh lanke) यांचादेखील कार्यक्रम असल्याने दोघांचेही एकत्रित प्रवेश या वेळी होऊ शकतात, अशा चर्चा सध्या सुरू आहेत.
(Edited By : Sachin waghmare )
R