Lucky Jadhav and MLA Khoskar : आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र आदिवासी परिषदेचे युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांच्याविरोधात रण फुंकले आहे. विधानसभेसाठी काँग्रेसचे तिकीट आपल्यालाच असा दावा त्यांनी केला असून, सध्या परदेशात असलेल्या आमदार खोसकर यांच्या अडचणींमध्ये भर पडणार का?, असा प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आला आहे.
इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या आदिवासी बहुल तालुक्यांचा मिळून तयार झालेल्या इगतपुरी विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा वरचष्मा असतो. अनुसुचित जमातीसाठी राखीव असलेल्या या मतदार संघाच्या निवडणुकीत खोसकर यांनी एकतर्फी बाजी मारत विजय संपादन केला होता. गत निवडणुकीवेळी पक्षांतराचे वारे वाहिले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे हिरामण खोसकर काँग्रेसवासी झाले.
तर त्यावेळच्या काँग्रेसकडून दोन टर्म आमदार राहिलेल्या निर्मला गावित या शिवसेनेच्या गोटात सामील झाल्या. साधी राहणी आणि मतदारसंघात दांडगा संपर्क अशी खोसकरांची खुबी आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी मतदार संघाची चांगली घडी बसवली. मात्र, काँग्रेसमध्ये दाखल झालेले हिरामण खोसकर काँग्रेसमध्ये खरोखरच रमले का?, असा प्रश्न काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सातत्याने पडतो. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसशी विशेषत: अजित पवार गटाशी असलेली सलगी अधुनमधून चर्चेत येते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
याशिवाय मोदींच्या स्वच्छता अभियानात खोसकर सहभागी होतात अन् शिवसेनेच्या कार्यक्रमालाही हजर असतात, यावर पक्षाची नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर लकी जाधव यांनी केलेल्या दाव्याला महत्व असल्याचे दिसते. लकी जाधव यांनी 2019 च्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून नशीब आजमवले होते. त्यांना तिसऱ्या क्रमाकांची जवळपास 9975 मते मिळाली होती. यानंतर लकी जाधव काँग्रेसमध्ये आले. सध्या त्यांच्याकडे आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पद आहे. शिवाय लवकरच राहुल गांधी यांची न्याय यात्रा इगतपुरीमध्ये दाखल होणार आहे. या दौऱ्याची तयारी जोरदार सुरू असल्याचे लकी जाधव यांनी सांगितले.
राहुल गांधी(Rahul Gandhi) यांच्या दौऱ्याचा निश्चितच पक्षाला फायदा होईल. तुर्तास आपले तिकीट फायनल, असा दावा करणाऱ्या जाधव यांनी खोसकर यांच्यावर टीका केली. इगतपुरी मतदार संघावर नेहमीच काँग्रेस पक्षाचे वर्चस्व कायम राहिले असून, उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छूकांमध्ये चढाओढ आणखी तीव्र होईल असे दिसते. विधानसभा मतदार संघात इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांचा समावेश असून, हा मतदार संघ अनुसुचित जमातीसाठी राखीव आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.