Vikhe Patil advice to Nitesh Rane : पाथर्डीतील मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम व्यापाऱ्यांना कानिफनाथ यात्रेतील बंदीच्या ठरावावर आणि भाजप मंत्री नीतेश राणेंच्या संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सावध प्रतिक्रिया दिली. "सर्वोच्च न्यायालयाने ग्रामसभेचे अधिकार मान्य केल्याने तिथं हस्तेक्षप करता येणार नाही. तसेच मंत्री राणे तिथं दौऱ्यावर येऊन ग्रामसभेच्या ठरावाचा आदर करणार असतील, तर ते मान्य होईल", असे मंत्री विखे यांनी म्हटले.
अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री विखे(Radhakrishna Vikhe) यांनी आज विविध बैठका घेतल्या. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सध्या राज्यात मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदीचा घेतलेला ठराव गाजत आहे. त्यावर मंत्री विखे यांनी अतिशय सावध भूमिका मांडली.
मंत्री विखे म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने ग्रामसभेचे सगळे अधिकार मान्य केले आहेत. ग्रामसभेने ठराव केलेला आहे, त्या पार्श्वभूमीवर समन्वयाचा मार्ग निघू शकतो का? यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. समन्वयाने मार्ग निघाला पाहिजे. समझोता करता येईल का, यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ग्रामसभेच्या अधिकाऱ्यांमध्ये हस्तक्षेप करता येणार नाही, हे मात्र निश्चित आहे".
मढी ग्रामसभेच्या या वादग्रस्त ठरावाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भाजप मंत्री नीतेश राणे(Nitesh Rane) दौऱ्यावर येत आहे. तिथं ते मानाची होळी पेटवणार आहेत. या ठरावाच्या पार्श्वभूमीवर ते तिथं काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यावर मंत्री विखे यांनी ग्रामसभेच्या भावनांचा आदर करण्यासाठी मंत्री राणे तिथं येत असतील, तर त्यावर आक्षेप घेण्यासारखे कारण नाही. संघटनांची भूमिकेनुसार ते काम करत राहतात. परंतु सरकार म्हणून समन्वयाचा मार्ग निघावा, अशी प्रतिक्रिया दिली.
दरम्यान, मंत्री नीतेश राणे यांचा मढी इथल्या संभाव्य दौऱ्यानिमित्ताने जिल्हा प्रशासन आणि पोलिस दल सावध झालं आहे. मढी इथं पोलिस बंदोबस्त वाढवण्याची तयारी करण्यात आली आहे. मंत्री राणे तिथं आक्रमक भूमिका शक्यता वर्तवली जात आहे. तसंच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील मढी ग्रामपंचायतीच्या ठरावाला पाठिंबा दिला आहे. ते देखील उद्या मढीत जाण्याची शक्यता आहे.
*२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप*
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.