Maharashtra cooperative banks Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Cooperative Bank Crisis : ‘सहकार’मध्ये मोठी उलथापालथ! 13 जिल्हा बँका प्रशासकांकडे, अहिल्यानगरवर 'ऑडिटर'ची नजर

State initiates administrative takeover of 13 district cooperative banks, including Thane and Ahilyanagar, citing governance concerns : राज्यातील सुमारे 13 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नियुक्त करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra cooperative banks news : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. बँकिंग कायदा (सुधारणा) अधिनियम 2025 नुसार मुदत संपत आलेल्या राज्यातील सुमारे 13 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नियुक्त करण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केली आहे.

अहिल्यानगरमधील जिल्हा बँकेवर विशेष लेखा परीक्षक (वर्ग एक) गौतम निकाळजे हे प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. ठाणे जिल्हा सहकारी बँकेचा प्रशासकीय कारभार जिल्हा उपनिबंधकांकडे देण्यात आला आहे.

अहिल्यानगरमधील जिल्हा सहकारी बँकेसह (Bank) ठाणे, नांदेड, यवतमाळ, अकोला, वाशिम, संभाजीनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, धुळे, जळगाव, जालना, सोलापूर आणि बीड यांसह अनेक प्रमुख जिल्हा बँकांवर प्रशासक नियुक्ती सुरू झाली आहे.

अहिल्यानगरमधील जिल्हा सहकारी बँकेच्या (Cooperative Banks) संचालक मंडळाची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपली होती. त्यामुळे बँकेची निवडणूक कोणत्याही क्षणी लागेल, अशी अटकळ बांधली जात होती. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. परंतु बँकेवर प्रशासक आल्याने निवडणूक प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.

या बँकेवर सध्या भाजप, राष्ट्रवादी यांच्या आघाडीचे वर्चस्व आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात नेहमीच चुरस राहिली. आतापर्यंत बँकेवर नेहमीच निंबाळकर-थोरात-घुले गटाचे वर्चस्व राहिले. अलीकडच्या काळात विखे पाटील यांनी बाजी मारली होती.

निवडणुकीत पहिल्या टप्प्यात थोरात गटाचे उदय शेळके यांना अध्यक्षपद दिले होते. शेळके यांच्या निधनानंतर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी अध्यक्षपदावर बाजी मारली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला काटशह दिला होता. पुढे शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त झाले. त्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना संधी देण्यात आली आहे. त्यांचाही कार्यकाल संपल्याने सहकार खात्याने बँकेवर प्रशासक नियुक्त केला आहे.

सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून निवडणूक कार्यक्रम सुरू करण्याचा आदेश फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात काढले होते. त्यानुसार अहिल्यानगरमधील जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा सहकार विभागाने तालुका पातळीवर दिले होते. मार्चअखेर बँकेची निवडणूक लागण्याची शक्यता होती.

सहकार एक्सप्रेस धावणार का?

आतापर्यंत पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या बँकेच्या निवडणुका झाल्या आहेत. आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यातील या बँकेवर भाजपचे वर्चस्व आहे. आगामी निवडणुकीनंतर, तसेच राहते की पुन्हा सहकार एक्स्प्रेस धावते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT