Maharashtra Animal Insurance Scheme : राज्यातील पशुपालकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. सन 2018 पासून बंद असलेली 'पशुधन विमा योजना' पुन्हा सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ही योजना राबविण्यात येणार असून, राज्यातील लाखो पशुपालकांना जनावरांच्या मृत्यूमुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून संरक्षण मिळणार आहे. या निर्णयामागे आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले जात आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी पशुधन विमा योजनेचा प्रश्न उपस्थित करत सरकारचे (Maharashtra Government) लक्ष वेधले होते. पिकविमा योजनेप्रमाणेच पशुधनासाठीही विमा संरक्षण उपलब्ध असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सभागृहात ठामपणे मांडले. पशुपालन हा ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कुटुंबांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार असल्याने जनावरांचे आर्थिक संरक्षण करण्यासाठी योजना तातडीने सुरू करण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली होती.
ही योजना जवळपास आठ वर्षांपासून बंद असल्यामुळे या काळात जनावरांच्या मृत्यूमुळे अनेक पशुपालकांना मोठा आर्थिक फटका बसला. नैसर्गिक आपत्ती, रोगराई किंवा अपघातामुळे जनावरे दगावल्यास नुकसानभरपाईची कोणतीही प्रभावी यंत्रणा उपलब्ध नव्हती. या प्रश्नाकडे फारसे लक्ष गेले नसताना, सर्वसामान्य शेतकरी (Farmer) कुटुंबातून पुढे आलेले आमदार अमोल खताळ यांनी हा विषय सातत्याने शासनाच्या निदर्शनास आणून दिला.
राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेत गाई, म्हशी, बैल, रेडे, शेळ्या आणि मेंढ्यांना विमा संरक्षण मिळणार आहे. हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्ती, रोगराई, विषबाधा, सर्पदंश, दूषित पाण्यामुळे होणारे आजार, गंभीर अपघात तसेच विविध संसर्गजन्य आणि साथीच्या रोगांमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास पशुपालकांना आर्थिक नुकसानभरपाई मिळणार आहे. या निर्णयामुळे पशुपालकांना आर्थिक सुरक्षिततेचे कवच मिळणार आहे.
दरम्यान, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबतही आमदार अमोल खताळ यांनी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यासह केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. प्रकल्पाच्या विविध मुद्द्यांवर यावेळी सविस्तर चर्चा झाली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय तज्ज्ञ समितीची स्थापना केली असून, ही समिती रेल्वे मार्गाचे संरेखन आणि GMRT वर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा अभ्यास करणार आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील आवश्यक कार्यवाहीबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.