Vikhe Patil Vs Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Vikhe Patil Vs Pawar: खोटं बोल पण रेटून बोल, हाच पवारांचा धंदा; विखेंचा पलटवार

Mangesh Mahale

Shirdi News: नगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील आणि आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात लढत होत आहे. प्रचारात दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेl. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe Patil) हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे.

तत्कालीन खासदार बाळासाहेब विखेंपासून विरोध करण्याची परंपरा शरद पवार यांनी आजही कायम ठेवली आहे. नगर जिल्ह्यातील नेत्यांमध्ये भांडणं लावायचं काम पवारांनी केलं. त्यामुळे जिल्ह्याची प्रगती झाली नाही, असा आरोप विखे पाटलांनी केला आहे. ते शिर्डीत माध्यमांशी बोलत होते.

"शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी त्यांच्या कन्येच्या (सुप्रिया सुळे) विजयाची चिंता करावी. त्यांच्या वक्तव्यांना मी फारसं महत्त्व देत नाही. खोटं बोल पण रेटून बोल हाच त्यांचा धंदा आहे, असा घणाघात विखेंनी केला.

शरद पवारांच्या राजकारणात सातत्य कुठे आहे? असा सवाल विखेंनी उपस्थित केला आहे. "ते कधी पहाटे शपथविधी करायला सांगतात, कधी भाजपला पाठिंबा देऊन तो काढून घ्यायला सांगतात, काँग्रेसमध्ये असताना विदेशी मुद्द्यावर फारकत घ्यायची आणि ज्यांच्याशी फारकत घेतली त्यांच्याच पायाशी जाऊन बसायचं,"असा टोला विखेंनी पवारांना लगावला. "तुम्हाला तुमच्या सोयीनुसार राजकारण करायची मुभा आहे. त्यामुळेच तुम्हाला स्वकीय सोडून गेले, आता तुम्हाला परीक्षण करण्याची गरज आहे," असा सल्ला त्यांनी पवारांना दिला.

"पवारांनी नगर जिल्ह्यात जास्त सभा घ्याव्याl हाच आमचा आग्रह आहे, त्यांनी नगर जिल्ह्याचं कसं वाटोळं केलं हे त्यामुळे मला जाहीरपणे बोलता येईल. ते स्वतःला राष्ट्रीय नेते समजतात पण त्यांना अवघे 10 उमेदवार देता आले. काँग्रेसची हीच अवस्था आहे. स्वतःला नेते समजणाऱ्या बाळासाहेब थोरातांना जिल्ह्यात एकही जागा घेता आली नाही. विखेंवर काय टीका करायची करा, तुमचे अपयश तुम्ही मान्य करा," असा टोला त्यांनी लगावला.

महायुतीचे भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे यांना नगर दक्षिणमधून उमेदवारी (Nagar Lok Sabha Constituency 2024) जाहीर झाल्यापासून मंत्री विखे यांनी सातत्याने शरद पवार यांना लक्ष्य केले. नगर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्ये भांडणे लावून स्वतः स्वार्थ साधून घेतला. नगर जिल्ह्याचे सर्वाधिक वाटोळे कोणी केले असेल, तर शरद पवार यांनी केले आहे, असा गंभीर आरोप मंत्री विखे यांनी केला.

शरद पवार काल नगरमध्ये मुक्कामी होते. आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.शरद पवार यांनी मंत्री विखेंचे नाव घेण्याचेदेखील टाळले. 'तुम्ही ज्यांचे नाव घेता, त्यांच्यावर भाष्य करायला मला योग्य वाटत नाही', असे म्हणत शरद पवार यांनी मंत्री विखेंना फटकारले.

नगर दक्षिणमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढाई नसून, पवारविरुद्ध विखे, अशी लढाई आहे, असे मंत्री विखेंकडून सांगितले जाते. यावर शरद पवार यांनी म्हटले, "येथून काही मी उमेदवारीचा अर्ज भरलेला नाही. मी निवडणूक लढवत नाही. उगाच स्वतःचे महत्त्व दुसऱ्या माणसाबरोबर नाव जोडून वाढवायचे, हे काही शहाणपणाचे लक्षण नाही".

मंत्री विखे यांनी एका उद्योजकाला पाठवून नीलेश लंके (Nilesh Lanke) यांना उमेदवारी देऊ नका, असा निरोप दिला होता. हा उद्योजक कोण, असे विचारले असता शरद पवार यांनी हा उद्योजक नगरचा नसून, बाहेरचा आहे असे सांगितले. हे सांगताना शरद पवार यांनी त्यांचे नाव घेण्याचे टाळले.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT