Shalarth ID Scam Nashik : शिक्षण विभागाच्या नाशिक विभागीय कार्यालयातून झालेल्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात SIT ने केलेल्या प्राथमिक तपासाअंती शासनाची १६० कोटींची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. यातून शिक्षण व्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष तपास पथकाने (SIT)याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुमारे १६ हजार पानांचे प्राथमिक दोषारोपपत्र दाखल केले आहे. या खटल्याची पहिली सुनावणी शुक्रवार (३ जुलै) होणार आहे.
नाशिक रोड पोलिसांत मार्च २०२६ मध्ये शालार्थ घोटाळ्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणुकीसह बनावटीकरण गुन्हेगारी कारस्थान आणि संघटित गुन्हेगारीच्या कलमान्वये दाखल गुन्ह्यात राज्य शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष व तत्कालीन शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, तत्कालीन शिक्षणाधिकारी संशयित नितीन बच्छाव, भाऊसाहेब चव्हाण यांच्यासह १६ संशयितांचा समावेश आहे.
या गुन्ह्याचा तपास नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या एसआयटीचे प्रमुख व सहायक पोलिस आयुक्त संदीप मिटके करीत आहेत. एसआयटीच्या तपासानुसार प्राथमिक दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तर तपासातील प्रगतीनुसार, पुरवणी दोषारोपपत्र भविष्यात दाखल केले जाणार आहे.
SIT च्या आत्तापर्यंतच्या तपासानुसार, शालार्थ घोटाळ्यात १ हजार १९९ संशयितांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. संशयितांनी वेतन व इतर बिलांद्वारे शासनाची १६० कोटींची फसवणूक केली आहे. संशयितांविरोधात सबळ पुरावे संकलित करण्याचे काम एसआयटीकडून सुरू आहे. ठोस पुरावे हाती लागल्यानंतर एसआयटीकडून संशयितांविरोधात अटकेची कारवाई केली जाणार आहे. या संशयितांमध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांचे सचिव, संस्थाचालक व अध्यक्षांसह वेतन अदा करणारे लिपिक, मंजुरी देणारे वेतन अधीक्षकांसह शिक्षण उपसंचालकांचा समावेश आहे.
२०१४ पासूनचा हा घोटाळा आहे. संशयितांनी २०१४ ते २०२५ या दरम्यान शालार्थ घोटाळ्याच्या माध्यमातून शासनाची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. दाखल फिर्यादीनुसार, २२३ शाळांमधील ८२१ संशयित शिक्षक, कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. शिक्षण विभागातील कार्यालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही सहभाग आहे. आजच्या घडीला १६ संशयितांची प्रत्यक्ष नावे गुन्ह्यात समाविष्ट असून, यातील तिघांना अटक करण्यात आली होती. तत्कालीन उपसंचालक नितीन उपासनी, पवार आणि किरण पाटील अशी अटक केलेल्याची नावे असून, पाटील सध्या जामिनावर आहे. तर, उपासनी, पवार हे नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. भाऊसाहेब चव्हाण फरारी झाला आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिकरोड पोलिसांत मार्च २०२६ मध्ये याप्रकरणात गुन्हा नोंद आहे. नाशिक विभागातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील एकूण ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी बोगस आहेत. 'बँक डेटेड' आदेश दाखवून शासनाच्या तिजोरीतून सुमारे १५० कोटींचा अपहार झाला आहे.
मार्च २०१९ ते जून २०२५ यादरम्यान झालेल्या शालार्थ घोटाळ्यात उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यांतील तत्कालीन वेतन पथक कार्यालय अधीक्षक व लेखाधिकारी संशयित आहेत. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण संस्थांचे अध्यक्ष आणि सचिवांवरही संशय असून बोगस शालार्थ आयडी मिळवणारे ८४१ शिक्षक व शिक्षकेतर रडारवर आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.