Water Resources Department Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maharashtra Government : जलसंपदा विभागातील 16 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर टांगती तलवार : राज्यभर संताप; बेमुदत आंदोलनाचा इशारा

Maharashtra Water Resources Department : जलसंपदा विभागाच्या सुधारित आकृतीबंधात 9,982 हून अधिक नियमित पदे 'मृत संवर्ग' घोषित; 16,500 कर्मचाऱ्यांच्या भविष्याबाबत संघटनांनी उपस्थित केले प्रश्न, अहिल्यानगर-वाशिमसह राज्यभर निदर्शने.

Pradeep Pendhare

Maharashtra Government Employees : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने लागू केलेल्या सुधारित आकृतीबंधाच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. नव्या धोरणामुळे राज्यातील सुमारे 16500 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्याचा आरोप करत कर्मचारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अनेक महत्त्वाची पदे 'मृत संवर्ग' (पदे कायमस्वरूपी बंद) म्हणून घोषित करून ती कामे बाह्ययंत्रणेद्वारे करण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरात निदर्शने सुरू झाली असून, मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

महायुती सरकारच्या (Mahayuti Government) राज्य मंत्रिमंडळाने ऑक्टोबर 2026 मध्ये जलसंपदा विभागासाठी 110 नवीन सिंचन शाखांसह एकूण 39,755 पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मंजुरी दिली होती. त्यानंतर नोव्हेंबर 2026 मध्ये क्षेत्रीय कार्यालयांच्या आकृतीबंधाबाबत सरकार निर्णय जारी करण्यात आला. सुधारित रचनेतील काही तरतुदींमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. विभागातील कनिष्ठ लिपिक, शिपाई, आरेखक, अनुलेखक यांसह सुमारे 9 हजार 982 हून अधिक नियमित पदे 'मृत संवर्ग' म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

'मृत संवर्ग' ठरवलेल्या पदांवर यापुढे नियमित आणि कायमस्वरूपी शासकीय भरती (Recruitment) केली जाणार नाही. त्याऐवजी ही कामे कंत्राटी पद्धतीने किंवा खासगी बाह्ययंत्रणेमार्फत करून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासकीय कामकाजात झालेले संगणकीकरण, आरेखन कामात 'ऑटो-कॅड'सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रशासकीय खर्चावर नियंत्रण मिळवणे, यासाठी कालबाह्य ठरत चाललेल्या पदांची पुनर्रचना आवश्यक असल्याचा तर्क शासनाकडून मांडण्यात येत आहे. सरकारच्या या धोरणामुळे केवळ नवीन भरतीच थांबणार नाही, तर सध्या कार्यरत असलेल्या हजारो कर्मचाऱ्यांच्या करिअर आणि नोकरीच्या सुरक्षिततेवर थेट परिणाम होणार असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

पदोन्नतीचे मार्ग बंद

नोकरी आणि पदोन्नतीची साखळी विस्कळीत होण्याची भीती देखील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. एखादे पद 'मृत संवर्ग' घोषित झाल्यानंतर त्या संवर्गातील पदोन्नतीचे मार्ग बंद होतात. तसेच, आकृतीबंधातील बदलांमुळे अतिरिक्त ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे समायोजन कसे आणि कुठे होणार, याबाबत ठोस स्पष्टता नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.

जबाबदारीवर प्रश्नचिन्ह

आरेखक, लिपिक आणि क्षेत्रीय कर्मचारी हे सिंचन प्रकल्पांचे सर्वेक्षण, नकाशे, पाणीपट्टी वसुली आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचा कणा मानले जातात. ही पदे संपुष्टात आणून खासगी कंत्राटदारांवर विसंबून राहिल्यास कामाच्या दर्जावर आणि जबाबदारीवर परिणाम होऊ शकतो, असा आक्षेप घेतला जात आहे.

कर्मचारी निर्णयाविरोधात आक्रमक

कंत्राटीकरणाच्या धोरणामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी शासकीय सेवेत कायमस्वरूपी रुजू होण्याच्या संधी मर्यादित होतील, अशीही टीका होत आहे. सुधारित आकृतीबंधातील 'मृत संवर्ग' आणि 'बाह्ययंत्रणा' हे निर्णय मागे घेण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगर, वाशिमसह राज्यातील विविध जलसंपदा मंडळ कार्यालये आणि मुख्य अभियंता कार्यालयांसमोर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली आहेत. 'जलसंपदा बचाव'च्या घोषणां दिल्या जात आहेत.

संघटनांकडून आंदोलनाची तयारी

दरम्यान, प्रशासनाने या आक्षेपांवर तातडीने तोडगा काढून कर्मचाऱ्यांचे समायोजन, पदोन्नती आणि नोकरीच्या सुरक्षिततेबाबत लेखी आश्वासन न दिल्यास, आगामी काळात राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा थेट इशारा संघटनांनी दिला आहे. आंदोलन झाल्यास राज्यातील धरण व्यवस्थापन, कालवा देखभाल आणि सिंचन प्रकल्पांच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT