Ahilyanagar DCC Bank : जिल्हा बँकेच्या खुर्चीवर बसताच सुजय विखे फडणवीसांच्या दरबारात! खासदार लंके आव्हान देण्याच्या तयारीत?

Sujay Vikhe Patil meets CM Devendra Fadnavis after becoming Ahilyanagar District Bank chairman. Nilesh Lanke warning adds a political twist : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर, सुजय विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांसोबत भेटी घेतल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यातच कट्टर राजकीय विरोधकही नांगर घेऊन बँकेत जाण्याचा नीलेश लंके यांचा इशारा आहे.
Ahilyanagar DCC Bank
Ahilyanagar DCC BankSarkarnama
Published on: 
Updated on: 

Sujay Vikhe Patil meets CM Devendra Fadnavis : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

या भेटीत जिल्हा बँकेच्या आगामी कारभारासह जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामुळे जिल्हा बँकेच्या कारभाराला आता राज्य सरकारचे पाठबळ मिळणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा बँकेच्या (DCC Bank) सत्तेची सूत्रे सध्या भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या सहमती एक्स्प्रेसकडे आहेत. बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांपैकी या गटाकडे 17 जागा असून, एका अपक्ष संचालकानेही त्यांना साथ दिली आहे. त्यामुळे सहमती एक्स्प्रेसचे संख्याबळ 18 वर पोहोचले आहे. सभापती प्रा. राम शिंदे यांच्या गटाकडे दोन जागा असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके हे देखील संचालक म्हणून निवडून आले आहेत.

बँकेच्या अध्यक्षपदी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe), तर उपाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजितसिंह देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्षपदासाठी सुजय विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच कोणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार, याची चर्चा सुरू होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जो निर्णय घेतील, तोच अंतिम असेल, अशी भूमिका विखे पाटील यांनी सुरुवातीपासून मांडली होती.

Ahilyanagar DCC Bank
Ahilyanagar News : सुजय विखे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होताच बाळासाहेब थोरातांचा निलेश लंकेंच्या 'होमग्राऊंडवर' दौरा!

लंके-विखे पाटील संघर्षाचे बँकेतही पडसाद?

जिल्हा बँकेच्या आगामी कारभारात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके हे विरोधी भूमिका घेण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपासून लंके आणि विखे पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. आता जिल्हा बँकेच्या निमित्ताने हे दोन्ही राजकीय प्रतिस्पर्धी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.

Ahilyanagar DCC Bank
Ahilyanagar DCC Bank : 57 वर्षांपूर्वी जुळलेले विखे-थोरातांचे सूर पुन्हा जुळले; सुजय विखेंच्या सत्तेला थोरातांच्या जावयाची साथ!

लंके बँकेत नांगर घेऊन येणार

बँकेच्या कारभारात या राजकीय संघर्षाचे कितपत पडसाद उमटतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. खासदार नीलेश लंके यांनी शेतकऱ्यांचे हित आणि बँकेचे आर्थिक आरोग्य जपण्यासाठी बँकेत नांगर घेऊन जाणार असल्याचे विधान केले आहे. दुसरीकडे, अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी शेतकरी, कष्टकरी, कारखानदार आणि बँकेच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीत सहकार क्षेत्रावर चर्चा

अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लगेचच सुजय विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्हा बँकेच्या कारभारासाठी मुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन आणि राज्य सरकारचे सहकार्य मिळवण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची सद्यस्थिती, जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक सक्षम आर्थिक पाठबळ देणे, सहकारी संस्थांचे बळकटीकरण आणि ग्रामीण विकासात बँकेची भूमिका या विषयांवर चर्चा झाली.

मुख्यमंत्र्यांचे विखे पाटलांच्या कारभाराला बळ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यातील सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्या हातून चांगले काम घडावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. एकीकडे विखे-थोरात यांची सहमती एक्स्प्रेस, तर दुसरीकडे नीलेश लंके यांची संभाव्य विरोधी भूमिका, अशा राजकीय समीकरणांमध्ये सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचा कारभार कसा चालतो?मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे या कारभाराला राज्य सरकारकडून किती पाठबळ मिळते, याचीही उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.