Shivsena News : 'मुंबईचे आर्थिक आणि औद्योगिक महत्त्व कमी करून भविष्यात मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एकाच राज्यात सर्व संस्था, उद्योगधंदे जात असून, हा महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का आहे. मुंबईवरील अतिक्रमणे परतावून लावणे आणि मराठी माणसांच्या हिताचे रक्षण करण्याबाबत ठाकरे गटाच्या राज्यव्यापी अधिवेशनात ठराव करण्यात आला. याशिवाय रोजगार आणि आरक्षण असे आणखी दोन ठराव यावेळी संमत करण्यात आले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली सातपूर येथील डेमोक्रसी हॉटेलमध्ये पार पडलेल्या अधिवेशनात तीन महत्त्वाचे ठराव मांडण्यात आले. अर्थातच सर्वप्रथम मुंबई आणि महाराष्ट्र अस्मिता यास महत्त्व देण्यात आले. कारण, देशात अग्रगण्य असलेल्या राज्याची राजधानी मुंबईचे देशातच नव्हे, तर विदेशातही महत्त्व आहे. जागतिक आर्थिक उलाढालीचे केंद्र म्हणून मुंबईकडे पाहिले जाते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मुंबईतील उद्योगधंद्यांमुळे देशाच्या तिजोरीत अडीच लाख कोटी रुपयांची भर पडते. एक प्रकारे देशाचे पोट भरण्याचे काम मुंबई करते. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले. मराठी माणसांच्या रक्षणासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली. मात्र, आता मुंबईचे आर्थिक व औद्योगिक महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मोठे उद्योग, आर्थिक व राष्ट्रीय संस्था एका विशिष्ट राज्यात खेचून नेल्या जात आहेत, ही बाब महाराष्ट्राच्या अस्मितेस धक्का देणारी आहे. या आक्रमणाचा धिक्कार करीत मुंबईकरांचा, मराठी माणसांच्या अस्मितेसाठी प्राणपणाने लढण्याचा निर्धार अधिवेशनाच्या ठरावात संमत करण्यात आला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने या ठरावाला विशेष महत्त्व आहे. दरम्यान, कोणत्याही आरक्षणास धक्का न लावता मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी पूर्ण करावी, असा दुसरा ठराव यावेळी संमत करण्यात आला. केंद्र व राज्य सरकारने कंपन्या बंद करण्याचा सपाटा लावला आहे. नवीन नोकरभरतीची प्रक्रिया संपुष्टात आली आहे. त्यामुळे बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यातच केंद्र सरकारने वेगवेगळ्या कायद्याआधारे कामगारांच्या आयुष्यावर कुऱ्हाड चालवली आहे.
हे सर्व कायदे व तरतुदी सरकारने मागे घ्याव्यात. तसेच कंत्राटी भरती पद्धत बंद करून कोणत्याची पद्धतीची भरती ही सरकारी सेवेतील कायमस्वरूपी आणि लोकसेवा आयोगाची यंत्रणा वापरून करावी. इतर खासगी व्यक्ती अथवा संस्थांना यात स्थान असू नये, असा तिसरा महत्त्वाचा ठराव शिवसेना अधिवेशनात करण्यात आला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संमत करण्यात आलेल्या या तीन ठरावांची अंमलबजावणी पक्ष म्हणून शिवसेना कसे करणार, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.